पुणे : विवाह निश्चित झाल्यानंतर नियोजित पत्नी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौघरी याच्या संगनमत करुन केतन अगरवाल याला लोहगडावरील दरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. केतन आणि सिया बालीत ‘प्री-वेडिंग’ शूटसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात जाणार होते. मात्र, मुंबई विमानतळावर केतनचा पारपत्र हरवले. त्यामुळे बालीला जाण्याचे रद्द करण्यात आले. तपासात केतनचे पारपत्र सियाने लपविल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

केतन अगरवाल खून प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपी सिया हिचा केतनशी विवाह निश्चित झाला होता. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. सियाचे आरोपी चेतनशी प्रेमसंबंध होते. सियाला विवाह मान्य नव्हता. या कारणावरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. केतनचा लोहगडावरुन मृत्यू झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन खून प्रकरणाचा छडा लावला.

लोहगडावर सिया आणि केतन हे १८ जून रोजी फिरायला गेले होते. केतन लोहगडावरुन सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडल्याची माहिती सियाने अगरवाल कुटुंबीयांना दिली. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या दरीतील झुडपात केतनचा मृतदेह सापडला.

केतन अगरवाल अनुभवी ‘ट्रेकर’

केतन अगरवाल याला गियोराेहणाची आवड होती. डोंगर, दऱ्यात त्याला फिरण्याचा अनुभव होता. केतनचा दरी पडून मृत्यू झाल्याची बतावणी सियाने केली होती. त्यानंतर अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तांत्रिक तपासात गेल्या वर्षभरापासून आरोपी चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. सियाला केतनबरोबर होणारा विवाह मान्य नव्हता. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. आठवड्यापूर्वी सियाने चेतनशी संगनमत करुन केतनचा खून करण्याचा कट रचला.