पुणे : हवाई दलाचे विमान पुणे विमानतळावर उतरताना झालेल्या अपघातामुळे धावपट्टी बंद करण्यात आली होती. मात्र, हवाई दलाने रात्रभर काम करून धावपट्टी पुन्हा कार्यान्वित केली. सकाळी आठच्या सुमारास धावपट्टी कार्यान्वित झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हवाई दलाची आपत्कालीन परिस्थितीत वेगाने काम करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे.
हवाई दलाच्या विमानाला शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लोहगाव येथील पुणे विमानतळावर उतरताना अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. मात्र, या अपघातामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आली. विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद झाल्यामुळे येणारी नागरी विमाने गुजरातमधील सुरत, नवी मुंबई आणि गोव्यातील मोपा विमानतळाकडे वळविण्यात आली.
विमानाची चाके उघडण्यास तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे हवाई दलाकडून धावपट्टी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जवळपास नऊ तास धावपट्टी बंद ठेवावी लागली होती. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास विमानांचे उड्डाण, तर सकाळी आठच्या सुमारास विमान उतरण्यास सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवर संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव स्टेशनचे प्रमुख एअर कमोडोर सतबीर सिंग राय यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर धावपट्टीवर काम केले. त्यात आधी अपघातग्रस्त झालेले विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले. त्यानंतर धावपट्टी कार्यान्वित करण्यासह हवाई वाहतूक सुरक्षित करण्यास प्राधान्य देण्यात आले.
आवश्यक त्या सर्व तपासणी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी आठ वाजता धावपट्टी सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम आव्हानात्मक होते. मात्र, हवाई दलाने अल्पावधीत केलेल्या कामगिरीमुळे हवाई दलाची क्षमता अधोरेखित झाली आहे.
त्यानुसार सकाळी ८.५८ मिनिटांनी गोव्याहून आलेले विमान उतरले, तर ९.१७ मिनिटांनी दिल्लीला जाणाऱ्या पहिल्या विमानाचे उड्डाण झाले. आवश्यक सर्व सुरक्षितता तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. टप्प्याटप्प्याने हवाई वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती पुणे विमानतळ संचालकांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
