scorecardresearch

खड्डे आणि रस्ते

पावसात वाहने हळू का चालतात? असा प्रश्न पडण्याचे कारण नाही. कारण प्रत्येक वाहनचालकाला रस्त्यावरील पाण्याखाली मोठ्ठा खड्डा असेल, याची खात्री असते.

पुण्यातील नागरिकांचा हे शहर कधी ‘स्मार्ट’ होईल, यावर विश्वास बसण्याची शक्यता नाही. कोटय़वधी रुपये ओतले तरीही हे पुणे शहर असेच राहणार, असा त्यांना विश्वास आहे. तो सार्थ करण्यासाठी महापालिकेतील सर्वजण अगदी सरसावलेलेच असतात. दरवर्षी पाऊस येण्याचा महिना काही बदलत नाही. तरीही रस्त्यांची कामे जूनपूर्वी पूर्ण का होत नाहीत, याचे कोडे पुणेकरांना कधीच उलगडलेले नाही. रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्पुरते बुजवून पुणेकरांची तोंडे गप्प करण्याची पालिकेची सवय आता नवी राहिलेली नाही. त्यामुळे जूनपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांचा नट्टापट्टा केला जातो. पण तो पहिल्याच पावसात वाहून जातो. हा वर्षांनुवर्षांचा अनुभव आहे. यंदाही काही वेगळे घडले नाही.
पहिल्याच पावसात रस्त्यांची अशी काही धूळधाण उडाली, की ते रस्ते पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यताच नाही. अजून खरा पावसाळा सुरू व्हायचाच आहे, तर ही स्थिती. ऑगस्टमध्ये या शहरातील नागरिकांचे काय हाल होतील, हे आत्ताही सांगता येऊ शकेल. ही परिस्थिती उद्भवते, याचे कारण त्याकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने पाहण्याची पद्धत नाही. हे सारे मुद्दाम घडते की काय, असे वाटावे, असे पालिकेचे वर्तन असते. पालिकेचे आयुक्त बदलले तरीही ही स्थिती कधीही बदलत नाही. रस्ते हा शहराच्या विकासातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो, याचे भान केवळ पुस्तकात असून चालत नाही. त्याचा व्यवहारात अनुभव येणे आवश्यक असते. सध्या तर पावसाळी हवा पडली, तरीही पुण्यातील वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावतो.
पावसात वाहने हळू का चालतात, असा प्रश्न पडण्याचे कारण नाही. कारण प्रत्येक वाहनचालकाला रस्त्यावरील पाण्याखाली मोठ्ठा खड्डा असेल, याची खात्री असते. त्यामुळे तो वाहन हळू चालवतो आणि त्यामुळे सगळे शहर अक्षरश: पावसात न्हात उभे राहते. ज्या ठिकाणी वर्षांनुवर्षे पाणी साचते, तेथे ते वाहून जाण्याची सोय करण्यात कोणती अडचण असते, हे समजण्याच्या पलीकडचे आहे. परंतु काही ठिकाणी हमखास तळी निर्माण होतात आणि तेथे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बरे ठेवल्याने आपल्यावरील ओरडा कमी होईल, हा अंदाज कदाचित खरा ठरत असेल, परंतु पुण्याच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्यांना पावसाळ्याचे चार महिने अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागतात. शहराची अनियोजित वाढ हे त्याचे कारण आहे. घरे आधी बांधली जातात आणि नंतर रस्ते कधीच बांधले जात नाहीत. त्यामुळे कधी काळी तयार झालेल्या रस्त्यावर साधा डांबराचा थरही बसत नाही आणि तेथे राहणारे नागरिक जीव मुठीत धरून कसेबसे घरापर्यंत पोहोचतात.
रस्ते तयार करताना दर्जाची हमी कोणताही कंत्राटदार का देत नाही? रस्ता उखडला, तर त्याला काळ्या यादीत का टाकले जात नाही? त्याच्याकडून दंड का वसूल केला जात नाही? या प्रश्नांना उत्तर नसते. अधिकारी, नगरसेवक आणि कंत्राटदार यांनी एकत्र येऊन पुणेकरांचा छळ करण्याचा हा एककलमी कार्यक्रम आरंभलेला असतो. पर्याय नाही, म्हणून हे मुकाटय़ाने सहन करत पुणेकर हैराण होत असतात. त्यांच्या प्रश्नांची ना दाद ना फिर्याद. त्रस्त पुणेकरांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची पद्धत आता इतिहासजमा झाली आहे. कधी एकदा घरी पोहोचतो, अशी सगळ्यांची भावना. रस्त्यावर उतरून आपले प्रश्न तडीस नेणाऱ्या संघटनाही आता नामशेष झालेल्या आहेत. सगळेचजण त्रास सहन करत फक्त शिव्यांच्या लाखोल्या वाहण्याचा कार्यक्रम अव्याहतपणे करत राहतात. त्यामुळे सगळ्यांचेच फावते. हे कधी थांबेल, अशी शक्यता नाही. ते थांबवण्याची कुणाची हिंमतही नाही. अशा लुळ्यापांगळ्या अवस्थेतील पुणेकरांचा वाली तरी कोण?

मुकुंद संगोराम

mukund.sangoram@expressindia.com

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokjagar

ताज्या बातम्या