पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत आपण विकास केला असला तरी मोठा तीर मारलेला नाही. सीमेवर चीनसैन्याकडून आगळीक होते तेव्हा हे प्रकर्षांने जाणवते. स्वातंत्र्याची शताब्दी येईल तेव्हा तरी आपण जगात आणि विशेषकरून चीनसमोर डोके वर करून जगू शकू का? असा सवाल लडाखमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उपस्थित केला.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने वांगचुक यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी वांगचुक बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार रजनी पाटील, अभिनेते ओमी वैद्य, ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित टिळक, प्रणती टिळक आणि गीताली टिळक-मोने उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन वांगचुक यांच्या हस्ते झाले.

सुरक्षेवर चीनचा आपल्या तिप्पट खर्च पाहता आपण राजकारण आणि भ्रष्टाचार यातच गुंतून पडणार का? असा प्रश्न उपस्थित करून वांगचुक म्हणाले, चिनी मालावर केवळ बहिष्कार टाकून उपयोगाचे नाही. तर, लोकमान्यांच्या विचारांप्रमाणे स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिले पाहिजे. चीन आणि इतर देशांसाठी आपण कायमच बाजारपेठ राहिलो तर देश पुन्हा गुलामगिरीत जाण्याचा धोका आहे.

मातृभाषा जपा

मला मराठी समजत नाही. पण, येथे मातृभाषेचा सन्मान होतो, हे पाहून मला आनंद वाटला. लोक मातृभाषेला हीन समजून इंग्रजीला महत्त्व देतात. वास्तविक सर्व राज्यांनी मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे, असे सांगत वांगचुक यांनी मातृभाषा जपण्याचे आवाहन केले. शिक्षण स्थानिक संस्कृतीशी जोडलेले आणि जीवनावर परिणाम साधणारे असले पाहिजे. नोकरी देताना पुन्हा कौशल्ये शिकवावी लागत असतील तर तरुण पिढीचा शिक्षणाचा काळ आणि पैसा आपण नासवत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.