‘लोकसत्ता’चे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांचे निधन

राष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदांमध्ये सहभागी होऊन त्यांनी या परिषदांचे ‘लोकसत्ता’साठी वार्ताकनही केले

पुणे : ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र लक्ष्मण येवलेकर (वय ५३) यांनी मंगळवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मितभाषी आणि कार्यतत्पर असलेल्या येवलेकरांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ‘लोकसत्ता’ परिवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे.

येवलेकर ‘लोकसत्ता’मध्ये २६ वर्षे कार्यरत होते. विज्ञानविषयक लेखनासाठी त्यांची ख्याती होती. विज्ञान-तंत्रज्ञान या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. खगोलशास्त्र, रसायनशास्त्रातील किचकट संकल्पनांना सोप्या शब्दांत मांडण्यात त्यांचा हातखंडा होता.

राष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदांमध्ये सहभागी होऊन त्यांनी या परिषदांचे ‘लोकसत्ता’साठी वार्ताकनही केले. ‘लोकसत्ता’च्या विविध पुरवण्यांमध्ये त्यांनी विविध सदरांद्वारे लेखन, संपादनामध्ये योगदान दिले. ‘नोबेल’ पारितोषिक विजेत्यांच्या शोधांविषयी, योगदानाविषयी विस्तृत वृत्तलेख ते दरवर्षी करीत. येवलेकर यांनी पत्रकारितेचा प्रारंभ नाशिक येथून केला होता. पत्रकारितेसह येवलेकर यांनी अध्यापन क्षेत्रातही काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिटय़ूटसह विविध महाविद्यालयांतील पत्रकारिता विभागांमध्ये त्यांनी अध्यापन केले. अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय बनले होते. येवलेकर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta chief sub editor rajendra yevalekar dies zws