पुणे : मराठी नाटक आज नेमके कुठे आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर शनिवारी, १३ डिसेंबरला टिळक स्मारक मंदिरात जरूर या. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीत सहा महाविद्यालये विविध विषयांवरील उत्तमोत्तम एकांकिका सादर करणार आहेत आणि सायंकाळी या उत्साही तरुणाईसमोर प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि आलोक राजवाडे ‘नाटक’ याच विषयावर मुक्त संवाद करणार आहेत. नाटकाविषयी प्रेम असलेल्या पुणेकरांना या दोन्ही कार्यक्रमांचे आवर्जून निमंत्रण आहे!
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने राज्यभरात ओळख निर्माण केली आहे. पुणे केंद्राच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिकांतील विषयवैविध्य थक्क करणारे आहे. ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे. या पुणे विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरणारी एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत पुण्याचे प्रतिनिधित्व करील. त्यामुळे विभागीय अंतिम फेरीत दमदार सादरीकरण करून मुंबईचे तिकीट मिळवण्यासाठी सर्वच संघ आटोकाट प्रयत्न करणार आहेत.
ही विभागीय अंतिम फेरी पाहण्यासाठी नाट्यसृष्टीतील काही कलाकारही आवर्जून हजेरी लावतील. त्यामुळे त्यांच्या समोर आपली एकांकिका अधिकाधिक उत्कृष्ट पद्धतीने सादर करण्यासाठी संघांत चुरस असेल, हे नक्की!
पुणे विभागीय अंतिम फेरीच्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी आणि आलोक राजवाडे एक खास कार्यक्रम सादर करणार आहेत. विशेष म्हणजे ‘लोकांकिका’च्या व्यासपीठावरील हा पहिलाच प्रयोग असेल. ‘नाटक : गप्पा, अभिवाचन आणि चिंतन’ या कार्यक्रमात हे दोघे त्यांच्या आयुष्यात नाटकाने प्रवेश केल्यापासून, ते सजगतेने करण्यापर्यंतचा प्रवास एका सूत्रात गुंफून कथन करणार आहेत. यामध्ये हे दोघे कलाकार शाळा, महाविद्यालयाकडून एकांकिका स्पर्धा करतानाचे अनुभव, किस्से सांगतानाच, त्यांना आवडलेल्या पुस्तकातील काही उताऱ्यांचे, लेखांचे अभिवाचन करतील आणि त्या निमित्ताने नाटकासंबंधीचे, नाटकाने वेळोवेळी दिलेल्या अनुभवांचे चिंतनही मांडतील. त्यांच्याकडून मिळणारे हे ‘नाट्यधडे’ ‘लोकांकिका’च्या रंगमंचावरील कलाकार विद्यार्थी, नाट्यवेड्या पुणेकर रसिकांसाठीही पर्वणी ठरणार आहे.
सादर होणाऱ्या एकांकिका
डीईएस पुणे विद्यापीठ : व्हिक्टोरिया
नौरोसजी वाडिया महाविद्यालय : नाचसोहळा
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी : फोबिया
मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड : वामन आख्यान
शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय : बोहाडा
अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर : कुठलीये बायको?
पुणे विभागीय अंतिम फेरी
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे
प्रवेश : सर्वांना विनामूल्य खुला
वेळ : दुपारी १२.३० पासून…
प्रायोजक
मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक : लॅब इंडिया विदू इलेक्ट्रिक बायसिकल, झी टॉकीज, पुनित बालन ग्रुप, सोसायटी टी, डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. आणि लागू बंधू ज्वेलर्स
पॉवर्ड बाय : एन. एल. दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च
साहाय्य : अस्तित्व
टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रॉडक्शन
