पुणे : ‘नाटक ही जादू आहे. अनेक दशके रंगभूमीवर काम केल्यानंतर आजही तिसऱ्या घंटेनंतर सरकरणाऱ्या पडद्याची उत्सुकता वाटते. विद्यार्थ्यांनी एकांकिका स्पर्धांतील उत्साह, प्रयोगशीलता पुढेही नाटकातून जपण्याचा प्रयत्न करावा,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, गायक चंद्रकांत काळे यांनी गुरुवारी केले.
‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात काळे बोलत होते. काळे यांच्यासह विभागीय अंतिम फेरीचे परीक्षक गिरीश परदेशी, अश्विनी गिरी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर, वितरण विभाग प्रमुख वंदन चंद्रात्रे या वेळी उपस्थित होते. कुणाल रेगे यांनी अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
काळे म्हणाले, ‘मीही महाविद्यालयीन जीवनात एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी झालो. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या अंतिम फेरीला उपस्थित राहून पुन्हा त्या काळाचे स्मरणरंजन करता आले. विद्यार्थी नेटाने आणि उत्साहाने एकांकिका करत आहेत, प्रयोगशीलता दाखवत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे.’
‘आम्ही आमच्या काळात त्या वेळच्या वृद्धांचे उपदेश ऐकले नाहीत. त्यामुळेच नाटकाच्या क्षेत्रात काही तरी करू शकलो. एकांकिका स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५ टक्के लोक या क्षेत्रात टिकतात. काही लोक नोकरी करताना आवड म्हणून नाटक करत राहतात. मीही थोडेफार काम व्यावसायिक नाटक, चित्रपटात केले. मात्र, खऱ्या अर्थाने प्रायोगिक रंगभूमीवरच रमलो,’ असे त्यांनी सांगितले.
‘आताच्या काळात व्यावसायिकदृष्ट्या काम करणे आव्हानात्मक झाले आहे. मात्र, तळमळ, इच्छाशक्ती असल्यास काही संस्था नाटक करण्यासाठी मदतही करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढेही त्यांची प्रयोगशीलता जपण्याचा प्रयत्न करावा,’ असा सल्ला काळे यांनी दिला.
विभागीय अंतिम फेरीत सादर झालेले सर्व सहा प्रयोग वेगळे, चोख होते. अभिनय ठाशीव होता. आताच्या काळात सामाजिकदृष्ट्या तरुणांना जे विषय भावतात, त्यांच्या मनात ज्या विषयांबाबत घुसळण होत आहे, त्याची अत्यंत विचारपूर्वक मांडणी करण्यात आली. मात्र, नाटक हे माध्यम चित्रपटाच्या पद्धतीने हाताळले जात असल्याचे सातत्याने जाणवते. त्यामुळे नाटक या माध्यमाचा स्वतंत्रपणे अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. – अश्विनी गिरी, परीक्षक
प्राथमिक फेरीतील चाळणी करून निवडलेल्या सहा एकांकिका असल्याने चांगले काही तरी पाहायला मिळण्याची उत्सुकता, खात्री होती. स्पर्धेच्या निमित्ताने नवीन पिढी काय विचार करत आहे, त्यांची अभिव्यक्ती काय आहे, हे जाणून घेण्याची संधी मिळते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा महाराष्ट्रभर नावाजलेली आहे, या स्पर्धेचे कलात्मक मूल्य आहे. विभागीय अंतिम फेरीतील सर्व सहा एकांकिकांमध्ये वेगळेपण होते. – गिरीश परदेशी, परीक्षक
