scorecardresearch

राज्यभरातील शब्दवंतांसाठी यंदाही काव्यजागर; ‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

समाजातील अनेक घडामोडी अनेकदा अस्वस्थ करून सोडतात. राजकारणातील अनेक घटनाही अंतर्मनाला क्लेश देतात.

‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

पुणे : ‘शब्दांतून जे फुलते ते, शब्दांतून मांडत जावे’ असे सांगणाऱ्या कविवर्य सुधीर मोघे यांनी कविता ही आपली आयुष्यभराची सखी मानली. ‘सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ असे म्हणत तिची मनधरणीही केली. कविता हेच जीवन असे मानणाऱ्या मराठी माणसांनी कवितेवरही भरभरून प्रेम केले. ‘मराठी असे आमुची मायबोली, तिला बैसवू वैभवाच्या शिरी’ असे म्हणत, मराठी भाषेवरचे प्रेम व्यक्त करणाऱ्या मराठी जनांसाठी ‘लोकसत्ता’ने यंदाही ‘कविता मनोमनी’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

समाजातील अनेक घडामोडी अनेकदा अस्वस्थ करून सोडतात. राजकारणातील अनेक घटनाही अंतर्मनाला क्लेश देतात. आपण आपले भवताल किती भावनाशील होऊन पाहतो आणि त्याचा आपल्या जगण्यावर किती परिणाम होतो, याचे दर्शन साहित्यातील विविध प्रकारांमध्ये फार मोठय़ा प्रमाणात घडताना दिसत नाही, अशी तक्रार सातत्याने केली जाते. विचाराचे हे सूत्र लक्षात घेऊन ‘कविता मनोमनी’ या उपक्रमांत या वर्षी सामाजिक आणि राजकीय या विषयांवरीलच कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कविता स्वत:चीच असावी, अशी स्वाभाविक अट आहे. तसेच सहभागी होणाऱ्यांनी आधी प्रसिद्ध झालेली कविता पाठवू नये, अशी सूचना आहे. या कवितांची निवड मराठीतील नामांकित कवींच्या मंडळाकडून होणार असून निवडक कविता ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

कवींना आवाहन..

ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मागील वर्षी या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. यंदा दुसऱ्या वर्षी कवितांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रातील कवींना त्यांच्या कविता पाठवण्याचे आग्रहाचे आवाहन करण्यात येत आहे. शब्दवंतांना आपले समाजभान कवितेच्या माध्यमातून व्यक्त करायचे आहे.

कुठे पाठवाल

कविता केवळ ई-मेलद्वारेच पाठवायच्या असून त्या,

Loksatta.KavitaManomani@gmail.com    या मेल पत्त्यावरच पाठवाव्यात.

प्रायोजक..

’प्रस्तुती :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

’सहप्रायोजक :  ठाणे जनता

सहकारी बँक लि. ’पॉवर्ड बाय : नेटभेट

’हेल्थ पार्टनर :  ब्रह्मविद्या साधक संघ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta organizes kavita manonmani poetry awareness is available for vocalists across the state akp

ताज्या बातम्या