जन्मशताब्दीनिमित्त विशेषांकाद्वारे वाचकांसाठी खास शब्दनजराणा

( अग्रलेख : पुलंचा आठव )

‘अर्थसत्तेच्या, धर्मसत्तेच्या, राज्यसत्तेच्या बळावर जर नाना तऱ्हेच्या विचारांची कारंजी मुक्तपणाने उडविण्यास थांबविण्याचे प्रयत्न व्हायला लागले तर काय अनर्थ होतो, याला इतिहास साक्षी आहे..  साहित्यिकांच्या मेळाव्यात हे  माझे भय मी या क्षणी बोलून दाखविले नाही, तर ती आता प्रतारणा होईल, असे मला वाटते..’ ऐन आणीबाणीच्या काळात कराड येथे भरलेल्या एकावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय सूत्रे श्रीमती दुर्गा भागवत यांना सोपवताना पु. ल. देशपांडे यांनी काढलेले हे उद्गार त्यांच्या वैचारिक जडणघडणीचे एक वेगळे दर्शन घडवतात.

आपल्या बहुरंगी, बहुढंगी आणि अभिजात व्यक्तिमत्त्वाने अवघ्या मराठी मनांना बांधून ठेवणारा दुवा असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘उर्वरित पु.ल.’ हा खास विशेषांक प्रकाशित होणार आहे. या अंकात मराठी सारस्वतांच्या दरबारात गाजलेल्या कराड साहित्य संमेलनातील पुलंचे भाषण वाचायला मिळणार आहे.

जन्मशताब्दी वर्षांतही सर्व वयोगटांतील वाचकांना हवेसे वाटणारे लेखक म्हणून पुलंचा दबदबा अजूनही कायम आहे. या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या ‘अप्रकाशित पु.ल.’ या खास विशेषांकात उलगडले गेले. आता नव्या अंकाद्वारे पुलंच्या व्यक्तित्वाबाबत आणखी काही अपरिचित मासले वाचायला मिळणार आहेत.

अंकात काय?  पुलंचे व्यक्तिमत्त्व असे चिमटीत न सापडणारे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आणखीही काही वाचण्याची वाचकांची उत्सुकता काही अंशी पूर्ण करण्याचा प्रयत्न ‘उर्वरित पु.ल.’ या विशेषांकात करण्यात येणार आहे. पुलंना आलेली पत्रे आणि त्यांनी लिहिलेली पत्रे हा साहित्याचा एक अतिशय हृद्य नमुना आहे. अशी अनेक महत्त्वाची पत्रे या विशेषांकात वाचायला मिळतील. पुलंच्या व्यक्तित्त्वाचे पदर उलगडून दाखवणारे खास लेख हेही या अंकाचे वैशिष्टय़ असणार आहे.

विशेष आकर्षण..

पु. ल. देशपांडे यांच्या ‘गणगोत’ या व्यक्तिसंग्रहातील ‘दिनू’ म्हणजे पुलं आणि सुनीताबाईंचे मानसपुत्र डॉ. दिनेश ठाकूर. अगदी जन्मापासूनच ‘भाईकाका’ आणि माईआत्ये’ यांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या दिनेश ठाकूर यांनी या अंकासाठी खास लेख लिहिला असून, या दोघांवरही लिहिलेला त्यांचा हा पहिलाच लेख असल्याने, तो या विशेषांकातील एक महत्त्वाचा ऐवज असणार आहे.