‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा सायंकाळी पुण्यात प्रकाशन सोहळा; नामवंत शेफकडून पाककृतींच्या टिप्स
झणझणीत रस्सा आणि कोंबडी वडे असो की साजूक तुपात न्हाऊन निघालेली पुरणपोळी असो, र्ती-पोहा असो की शेवेची भाजी असो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थाची नावे घेताच तोंडाला पाणी सुटते. या पदार्थाशी खाद्यसंस्कृतीच नव्हे तर महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचीही नाळ जुळलेली आहे. महाराष्ट्राच्या या खाद्यसंपन्नतेवरच आज, मंगळवारी सायंकाळी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे चवदार गप्पा रंगणार आहेत. ‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ हे घोषवाक्य घेऊन राज्यातील विविध खाद्यसंस्कृती व पदार्थाची ओळख करून देणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या अंकाचे येथे प्रकाशन होत असून त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नामवंत शेफ विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ, त्यांची पाश्र्वभूमी, विस्मरणात गेलेले पदार्थ, पाककृती यांविषयी दिलखुलास गप्पा मारणार आहेत.
महाराष्ट्राच्या एका भागातील वैशिष्टय़पूर्ण पदार्थाची दुसऱ्या भागातील खवय्यांशी ओळख करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’ अंकातून ‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ ही संकल्पना मांडली आहे. मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा) आणि विष्णू मनोहर (विदर्भ) या नामांकित शेफनी या अंकातून महाराष्ट्रातील रुचिसंपन्न खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली आहे. खाद्यसंस्कृतीबरोबरच त्या त्या प्रांतातील चवदार, चटकदार, चमचमीत पाककृती तेवढय़ाच आकर्षित छायाचित्रांसह या अंकात वाचायला मिळणार आहेत.
खवय्यांची भूक भागवण्यासोबत मेंदूला खुराकही देणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या प्रत्येकाने संग्रही ठेवावा अशा अंकाचा प्रकाशन सोहळाही तितकाच रंगतदार होणार आहे. या कार्यक्रमात पाचही शेफ विविध प्रांतांतील खाद्यपदार्थाबद्दल रसिकांसोबत गप्पा मारणार आहेत. यावेळीपाककृतींचे सादरीकरणही होणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.

‘पूर्णब्रह्म’च्या अंकात
एकच भाजी असो किंवा एकच पदार्थ, परंतु तो प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कोकणात भाजीत ओल्या खोबऱ्याचा सढळ हाताने वापर केला जातो. तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट किंवा खुरासणीची चटणी वापरली जाते. गावानुसार पदार्थाची चव आणि नाव बदलते. पण तरीही प्रत्येक ठिकाणी त्याची लज्जत न्यारी असते. अशा बहुरंगी खाद्यसंस्कृतीची ओळख ‘पूर्णब्रह्म’ अंकात करून देण्यात आली आहे. विविध पाककृती आणि टिप्स या अंकात वाचायला मिळतील.

‘पूर्णब्रह्म’ प्रकाशन सोहळा
’ कधी : मंगळवार, २८ जून
’ कुठे : टिळक स्मारक मंदिर, पुणे<br />’ किती वाजता : सायं. ५ वा.
’ प्रवेश सर्वासाठी खुला

‘विम’ने प्रस्तुत केलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकाचे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून ‘टेस्ट पार्टनर’ रामबंधू आहेत. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’, ‘आयुशक्ती’ यांचे या उपक्रमाला पाठबळ लाभले आहे तर, ‘कलर्स मराठी’ टेलिव्हिजन पार्टनर आहेत.