‘माती, पाणी, हवा आणि प्राण्यांना मारण्याची जी प्रक्रिया माणसाने सुरू केली आहे, त्याने निदान माणूस तरी वाचणार आहे का,’ या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी वडील राधा मोहन यांनी ओडिशात सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून ९० एकर नापीक जमिनीचे घनदाट जंगलात रूपांतर करणाऱ्या ‘पद्मश्री’ साबरमती यांच्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी तुषार सूर्यवंशी यांनी साधलेला संवाद. भात, भाज्या, डाळी आणि भरड धान्यांबरोबरच सातशेपेक्षा अधिक देशी वाणांचे संवर्धन व संशोधन ‘संभव’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थशास्त्रात पदवी, मोठ्या पगाराची नोकरी ते ‘संभव’च्या उजाड जमिनीवर सेंद्रिय शेती या प्रवासात कोणत्या समस्या आल्या, काय शिकायला मिळाले?

– अर्थशास्त्र शिकण्याची इच्छा होती म्हणून पदवी घेतली. मात्र, पर्यावरणाच्या प्रश्नांकडे ओढा होता. वडील पर्यावरणवादी. निसर्गाबरोबर जगण्याचे संस्कार घरातूनच होत गेले. पर्यावरणासाठी काम करायचे म्हणून वडिलांनी हाती घेतलेल्या सेंद्रिय शेतीच्या कामात झोकून द्यायचे ठरवले आणि नोकरी सोडली. माझ्यासाठी हा निर्णय सोपा होता; पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर अनेक समस्या समोर येत गेल्या. सेंद्रिय शेती केली म्हणजे आपण उपाशी मरू, असे सामान्य माणसापासून प्रशासकांपर्यंत सगळ्यांनाच वाटायचे. हा समज मोडून काढण्यासाठी नायगड जिल्ह्यातील पडीक जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला. ‘पीक येणार नाही; हे असंभव आहे,’ असा इशारा स्थानिकांनी दिला. पण, यातूनच पुढे ‘संभव’चा जन्म झाला. जिद्द, संयम आणि विश्वास ठेवला, की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करता येतात.

शेतीतून अधिकाधिक उत्पन्न काढण्याची स्पर्धा सुरू आहे. ‘जीएमओ’सारखे पर्याय समोर येत असताना सेंद्रिय शेतीचा, विशेषतः देशी वाणाचा आग्रह का?

– जास्तीत जास्त दवाखाने काढल्याने, मोफत उपचार दिल्याने रोगी बरे होणार आहेत का? रोग संपणार आहेत का? प्रश्नाचे मूळ समजून घ्यायला हवे. अधिकाधिक उत्पन्न काढण्यासाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर वाढतो आहे. त्यातून पिकवलेला भाजीपाला कित्येक घरांत जातो. पुढे याचेच रूपांतर दुर्धर आजारांत होते. आपल्याला नेमके काय हवे आहे? सकस आहार की दुर्धर आजार? हे ठरवायला हवे. देशी वाणाची पेरणी हा सकस आहार मिळविण्याचा मार्ग आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी अनेक गैरसमज आहेत. मात्र, देशी वाणाच्या वापरातूनही कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवता येते. भाताचेच उदाहरण घ्या. नायगड जिल्ह्यात एक पोती तांदळाचे उत्पन्न मिळविणारा शेतकरी देशी वाणाच्या वापरातून तीन पोती उत्पन्न मिळवतो आहे. त्याचे उत्पन्न तिपटीने वाढले आहे. संकरित बियाणे केवळ एकदाच वापरता येते. त्याला अनेक प्रकारच्या खतांची गरज असते. संकरित बियाण्यांपेक्षा देशी बियाणे कमी पैशांत उपलब्ध असतात. देशी बियाणे शेतकरी पुन्हा वापरू शकतो आणि ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.

शेतकऱ्यासमोर दुष्काळ, अनियमित पाऊस अशा अनेक समस्या आहेत. शेतात आलेल्या पिकाचे एका किडीनेही मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेतीचा पर्याय का निवडावा?

– रासायनिक खतांच्या वापराने सर्वांत आधी जमिनीला कमकुवत केले, कीटकनाशकांची फवारणी रोपाला कमकुवत करत आहे. मग, पीकही कमकुवतच येणार की. त्यात एकपीक पद्धती. म्हणजे कीड लागली, की संपूर्ण पिकाचे नुकसान. रासायनिक खतांना इंग्रजीत ‘फर्टिलायझर’ म्हणतात. फर्टिलायझर म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवणारे, असे असेल तर त्यांचा वापर कमी व्हायला हवा. याउलट दिवसेंदिवस हा वापर वाढतो आहे. यातून जमीन नापीक व कडक होत आहे. त्याऐवजी जैविक खते, जैविक कीटकनाशके यांचा वापर वाढवायला हवा. शेतीत बहुपीक पद्धती रुजवायला हवी. याने मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येईल. बदलते पर्यावरण ही गंभीर समस्या आहे. या बदलाचा सामना करण्यासाठी इतर कोणतेही उपाय उपयोगाचे नाहीत. निसर्गाने दिलेले शाश्वत विकासाचे ज्ञानच उपयोगी पडेल. सेंद्रिय शेती हा निसर्गाने दिलेला असाच एक मार्ग आहे.

सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी प्रशासनाची व राज्यकर्त्यांची भूमिका कशी असावी?

– हरित क्रांतीची सुरुवात झाल्यापासून केवळ संकरित बियाणांच्या वापरावर लक्ष देण्यात आले. जास्तीत जास्त उत्पन्न देणारी संकरित बियाणे मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आली. कृषी विद्यापीठांतूनही हेच शिकवले गेले. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांची व्यवस्था करण्यात आली. यासाठी बाजारपेठांतूनही पाठबळ देण्यात आले. दुसरीकडे मात्र, सेंद्रीय शेती, जैविक खते, देशी बी-बियाणांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यात अधिक संशोधन झाले नाही. परिणामी, शास्त्र समजून सेंद्रीय पद्धतीने शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. राज्यकर्त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी मूलभूत धोरणे आखायला हवीत. जैविक उत्पादनांना चालना देण्यासाठी, त्यांना बाजारपेठांतूनही पाठबळ द्यायला हवे. tushar.suryawanshi@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta representative tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee pioneer in organic farming pune print news tss 19 zws