नगर : ज्येष्ठ पत्रकार, दैनिक समाचारचे संपादक, ‘लोकसत्ता’चे नगर आवृत्तीचे माजी ब्युरो चीफ महेंद्र अरविंद कुलकर्णी यांचे आज, शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी दुपारी शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.कुलकर्णी यांच्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक लोकयुगमधून झाली. नंतर त्यांनी दैनिक लोकमतमध्येही काम केले. दैनिक लोकसत्ताच्या नगर आवृत्तीसोबत ते वार्ताहर म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी ‘ब्युरो चीफ’पर्यंत विविध पदे भूषवली. या नंतर दैनिक समाचार या सायं दैनिकाचे मालक, संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. कुलकर्णी यांनी नगर शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलकर्णी मूळचे कोपरगाव तालुक्यातील शिंगवे गावचे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत त्यांनी पत्रकारितेत अफाट लोकसंपर्कातून यशस्वी कारकीर्द गाजवली. राजकारण, समाजकारण, सहकार, पाटपाणी, इतिहास, नाट्यकला हे त्यांचे आवडीचे विषय होते. ‘राजकीय पत्रकारिता’ हा त्यांचा आवडीचा विषय होता. जुने संदर्भ देत लिखाण करण्याची त्यांची शैली वाचकांना विशेष भावत असे. नगर शहरावर ते निस्सीम प्रेम करणारे होते, त्यातूनच ते शहर विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडत. प्रेस क्लबने राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या नाटकात त्यांनी काम केले होते. जिल्हा क्रिकेट संघटना कार्यकारिणी सदस्य, श्री समर्थ मंडळ ट्रस्टचे सचिव, वसंतराव देशमुख पत्रकार पुरस्कार निवड समितीचे सदस्य अशा विविध पदांवर महेंद्र कुलकर्णी यांनी काम पाहिले. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. त्यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. महेंद्र कुलकर्णी यांचा मित्र परिवार राज्यभर विस्तारलेला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta senior journalist mahendra kulkarni died by heart attack in ahmednagar pune print news rmm
First published on: 09-12-2022 at 23:24 IST