दहावीमध्ये ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवूनही अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांला आणि त्याच्या पालकांना शिक्षणाची उत्तम संधी मिळावी असे वाटत असते. परंतु, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती यामुळे हे विद्यार्थी त्यांची शैक्षणिक कारकीर्द घडवू शकत नाहीत. अशा आर्थिकदृष्टय़ा गरीब असलेल्या ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना लोकसेवा प्रतिष्ठान दत्तक घेणार आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव येथील नेताजी सुभाषंचद्र बोस सैनिकी शाळा आणि पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूलतर्फे दहावीच्या परीक्षेत ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या परंतु आर्थिकदृष्टय़ा गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अकरावीसाठी ७५ विद्यार्थी दत्तक घेण्यात येणार आहेत. अकरावी आणि बारावी या दोन वर्षांकरिता या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी लोकसेवा प्रतिष्ठानकडे राहणार आहे. लोकसेवा ई-स्कूलमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणारे प्रत्येकी २५ विद्यार्थी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये एनडीएला प्रवेश घेऊ इच्छिणारे २५ असे ७५ विद्यार्थी दत्तक घेण्यात येणार आहेत. या दोन्ही शाळांमध्ये ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, उत्तम शिक्षक याबरोबरच एडीए, जेईई आणि नीट साठी स्वतंत्र व्यवस्था आहे. निवास आणि भोजनव्यवस्था सर्वोत्तम असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी दिली. इच्छुक विद्यार्थ्यांनी राहुल यादव (मो. क्र. ९७६३४५८६३४) आणि पांडुरंग जगताप (मो. क्र. ९८६०९५०१६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.