अण्णा भाऊ साठे यांच्या घराच्या शोधाची कथा

अण्णा भाऊ यांच्या मृत्यू दाखल्यावरून त्यांच्या घराचा शोध घेण्याची प्रकिया सुरू झाली,

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

‘माझी मैना गावाकडं राहिली माझ्या मनाची होतीया काहिली’ या गीताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी अस्मिता जागृत करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मुंबईतील मूळ घराचा शोध लागला आहे. साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घेत टपाल खात्यामध्ये पोस्टमन म्हणून काम करणाऱ्या धर्मपाल कांबळे यांनी एक तप संशोधन करून आणि प्रसंगी पदरमोड करून या घराचा शोध लावला आहे. मात्र, शासनाने दिलेल्या या घराचा ताबा गेली ४८ वर्षे कुमुदिनी कुलकर्णी यांच्याकडे आहे.

धर्मपाल कांबळे यांच्या संशोधनाचा समावेश असलेले ‘शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या घराच्या संशोधन कार्यासाठी आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी कांबळे यांनी गेली १२ वर्षे खडतर परिश्रम घेतले. ते सध्या मार्केट यार्ड पोस्ट कार्यालयामध्ये काम करीत आहेत. शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना या कामासाठीच रजा घेऊन प्रवासासाठी पैसे खर्च केले आहेत. हे संशोधन पुस्तकरूपाने वाचकांसमोर ठेवण्यासाठी त्यांनी पत्नीच्या बांगडय़ा विकून रक्कम उभी केली. माझ्या आवडीच्या कामासाठी वेळ देता आला आणि साठे यांच्या घराचा शोध घेण्याचे काम सिद्ध झाले, याचा आनंद असल्याची भावना कांबळे यांनी व्यक्त केली.

अण्णा भाऊ यांच्या मृत्यू दाखल्यावरून त्यांच्या घराचा शोध घेण्याची प्रकिया सुरू झाली, असे सांगून कांबळे म्हणाले, हा दाखला मिळविण्यासाठी मी बृहन्मुंबई महापालिकेकडे ३१ ऑगस्ट २००७ रोजी रीतसर अर्ज केला आणि त्याच दिवशी मला मिळाला. त्यानुसार अण्णा भाऊंचे निधन १८ जुलै १९६९ रोजी झाले असून त्यांच्या मृत्यू दाखल्यावर ‘सिद्धार्थनगर, चाळ नं. ३२, गोरेगाव, मुंबई’ असा पत्ता होता. तत्कालीन समाजकल्याणमंत्री बाबुराव भारस्कर यांनी ‘म्हाडा’मार्फत साहित्यिक म्हणून साठे यांना हे घर दिले असल्याची माहिती कागदोपत्री समोर आली. मात्र, त्या पत्त्यावर प्रत्यक्ष गेलो असताना तेथे कुमुदिनी कुलकर्णी आणि त्यांचे चिरंजीव संदेश कुलकर्णी हे वास्तव्यास असल्याचे दिसून आले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात या घराची कागदपत्रे गहाळ झाल्याचे लेखी कळविले होते. त्यानंतर डॉ. मििलद माने यांच्या सहकार्याने म्हाडाच्या बांद्रा येथील कार्यालयात जाऊन अण्णा भाऊंच्या घराची कागदपत्रे मिळवून त्याचा अभ्यास केला. त्यानंतर मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र, या प्रकरणी सरकारने लक्ष घातले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lokshahir annabhau sathe original house in mumbai discovered

ताज्या बातम्या