पुण्याच्या लोणावळ्यात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या झालेल्या हत्येच्या तपासाची माहिती नातेवाईकांना का दिली जात नाही, हल्लेखोर का सापडत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोघांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही.
सार्थक आणि श्रुती यांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरात तीन एप्रिलला आढळून आले होते. या घटनेला आज एक महिना झाला आहे. मात्र पोलिसांच्या हाती अद्यापही आरोपींच्या संदर्भात कोणतीही माहिती लागलेली नाही. लोणावळा पोलिसांनी या हत्येप्रकरणी आठ तपासाच्या तुकड्या केल्या होत्या. तसेच पाचशेहून अधिक नागरिकांची लोणावळा पोलिसांनी चौकशी देखील केली होती. मात्र, पोलिसांना हत्येतील आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. हे दोघेही सिंहगड महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते. या हत्येनंतर येथील पर्यटन स्थळावर परिणाम जाणवला आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटिल (कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी देखील ही घटना झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. तसेच या संबंधी लवकरात लवकर तपास करावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना दिले होते.
या दुहेरी हत्येनंतर सात ते आठ दिवसांनी ज्या दुचाकीवरुन हे दोघे गेले होते ती दुचाकी पोलिसांच्या हाती लागली. मात्र, अद्याप श्रुती आणि सार्थक यांच्या मोबाईलचा तपास लागलेला नाही. या घटनेचा निषेध म्हणून सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थांनी कॅडल मार्च काढला होता. त्यावेळी लोणावळा पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. दोन दिवसापूर्वीच मयत सार्थक वाघचौरे याच्या नातेवाईकांनी येऊन लोणावळा पोलिसांची भेट घेत तपासविषयी विचारणा केली. तपासाबाबतीत पोलीस गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी मागणी करत पोलिसांना त्यांनी निवेदन दिले. लोणावळा पोलिसांना आता वीस दिवसांचा अवधी दिला असून योग्य तो तपास करावा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे सार्थकच्या भावाने म्हटले होते.
सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे मात्र दुचाकी वगळता पोलिसांना कुठलाही ठोस पुरावा हा सापडला नाही त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून टीका केली जात आहे. त्यामुळे लोणावळा पोलीस या हत्येचा तपास लावण्यास आणखी किती वेळ घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.