पिंपरी : लोणावळ्यातील नांगरगाव येथील आलिशान व्हिलातील बंगल्यात सुरू असलेल्या कथित बेकायदा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून चालेल्या रॅकेटमध्ये अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशांतील नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून खंडणी उकळली जात असल्याचा संशय आहे.

अमान शेख (वय २१), मोहम्मद शेख (वय २६), रिहान घनानी (वय १९), मोहम्मद सय्यद (वय २१), तावीश शेख (वय २०), कामरान शेख (वय २०), सद्दाम खान (वय३०), झहिर खान (वय २१), जाहीद शेख (वय २०), शादाब सय्यद (वय २६), इरफान शेख (वय ४१), समीर शेख (वय ३३), इरशाद शेख (वय ३२), अमीर खान (वय ३१), मकसूद चौधरी (वय २०) मोहम्मद शेख (वय २६), अब्दुल खान (वय २२, सर्व रा. मालवणी, मालाड, मुंबई), कुलदीप बागडी (वय ३७, रा. माटुंगा, मुंबई), सुजल राणा (वय ३५, रा.शिलाँग, मेघालय), धनराज बोस (वय २६, रा. बदलापूर, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोकडसह ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले असता एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब खडके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील नांगरगाव येथील एका व्हिलामध्ये बुधवारी पहाटे हा प्रकार सुरू होता. आरोपींनी भाड्याने घेतलेल्या या व्हिलामध्ये अनधिकृत कॉल सेंटरमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी लॅपटॉप, मोबाईल आणि विविध अॅप्लिकेशन्सचा वापर करण्यात येत होता. नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे व ओळखपत्रांच्या आधारे नागरिकांचा विश्वास संपादन केला जात होता.

तसेच, संबंधित नागरिकांच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि बँक खात्यांशी संबंधित माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात होती. या माध्यमातून मिळवलेली रक्कम हवाला आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे भारतीय चलनात वळवली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक महेश विधाते तपास करीत आहेत.