महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या नागरिकांना लोणावळा व खंडाळ्यातील हॉटेलधील बिलात २० टक्क्य़ांची सवलत देण्यात येणार आहे. २१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचा निर्णय लोणावळा, खंडाळ्यातील हॉटेल, रेस्टॉरन्ट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वागत केले आहे.
मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी याबाबतची माहिती दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भागडे यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोणावळा व खंडाळा येथील हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यानुसार २१ फेब्रुवारीला मतदान केल्याचा पुरावा दाखविल्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेलातील वास्तव्यावर २० टक्के, तर रेस्टॉरन्टमध्ये १५ टक्क्य़ांची सवलत देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
मतदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती सर्व हॉटेल व्यावसायिक फलकाच्या माध्यमातून आपापल्या हॉटेलच्या दर्शनी भागात लावणार आहेत.