पुणे : लोणावळ्यातील लायन्स पाॅॅईंट परिसरातील दरीत खासगी कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापक तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. आठवडभरापूर्वी लायन्स पाॅईंट येथील दरीत नवी मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
वीरेंद्र सिन्हा (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ‘सिन्हा हे एका खासगी कंपनीत विक्री व्यवस्थापक होते. संबंधित कंपनी ‘शिपिंग कंटेनर’ क्षेत्राशी संबंधित आहे. सिन्हा हिंजवडी भागात राहायला होते. कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी फेब्रुवारी महिन्यात मुंबईती माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते. गुरुवारी सिन्हा यांच्या पत्नीचा वाढदिवस होता.
लोणावळ्यातील लायन्स पाॅईंट परिसरातील दरीत सिन्हा यांनी उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी सिन्हा यांनी पत्नी आणि निकटवतीर्यांना मोबाइलवर संदेश पाठविला होता,’अशी माहिती लोणावाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तायडे यांनी दिली.
लायन्स पाॅईंट परिसरात सिन्हा यांनी मोटार लावलेली होती. या घटनेची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू संस्थेला कळविण्यात आली. त्यानंतर संस्थेतील सदस्य योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार, देवश्री चिले, सचिन गायकवाड, कुणाल कडू, कपिल दळवी, योगेश दळवी, सागर दळवी यांनी शोधमोहिम राबविली. संस्थेतील सदस्य दोर लावून दरीत उतरले. त्यांनी सिन्हा यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी दरीतून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी सिन्हा यांनी पाठविलेल्या संदेशात काही जणांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करत आहे, असे संदेशात नमूद केले होते. त्यात पाच महिलांसह आठ जणांच्या नावाचा उल्लेख होता. सिन्हा यांच्या पत्नीने याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सिन्हा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
