पुणे : लोणावळा, मावळ तालुक्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. लोणावळा शहर परिसरात २४ तासात ६२५ मिलिमीटर पाऊस झाला.

पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ओढ्यांवरील पूल बंद करण्यात आले. नागरिकांनी नदीपात्राच्या बाजूला जाऊ नये, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पवन मावळातील ओझर्डे गावातील रस्ता वाहून गेला आहे. लोणावळ्यातील पांगोळी स्मशानभूमीजवळ दरड कोसळली आहे. खंडाळ्यातील काही भागांत डोेंगर कपारातील माती वाहून आली आहे. लोणावळा शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले आहे‌ सोसायटी, तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.

टाटा धरण पूर्ण भरल्याने भिंतीवरून पाणी लोणावळा शहरात शिरले आले आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने कुटुंब अडकले. प्रशासन, तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मुंबई-पुणे जुना महामार्गावर नायगाव साते येथे पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. पवनानगर बाजारपेठ, तसेच वडगाव मावळ बाजारपेठेत पाणी शिरले आहे.

नोकरदारांची धावपळ

मुंबई -पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा घाटात मंकी हिल येथे दरड कोसळली. त्यानंतर मुंबई-पुणे रेल्वे सेवा बंद करण्यात आली. कामाचा पहिला दिवस असल्याने अनेकांनी नेहमीप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी गर्दी केली होती. रेल्वे गाड्या, तसेच एसटी सेवा बंद केल्याने नोकरदारांची गैरसोय झाली.

ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने पौड- माणगाव वाहतूक बंद

संततधार पावसामुळे खंडाळा घाट, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी कोसळण्याच्या धोका असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला. दोन्ही बाजूंनी या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोणावळ शहर, तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळली. मिसिंग लिंकसह द्रुतगती मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली. पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे माणगावकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने पौड ते माणगाव दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

‘पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने रेड ॲलर्ट जाहीर केला आहे. पुणे शहर, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरून पुणे-मुंबईकडून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आाहे. घाट क्षेत्र, तसेच द्रुतगती मार्गावर पावसामुळे डोंगर कपारीतील दगड सैल झाल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्ग, तसेच जुना महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे,’ अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

घाट क्षेत्र, तसेच द्रुतगती मार्गावर महामार्ग पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.