भुशी धरण रविवारी पहाटे ‘ओव्हर फ्लो’ झाले. धरणाच्या सांडव्यावरुन मोठया प्रमाणात पाणी वाहू लागले असून रविवारी या ठिकाणी पर्यटकांची एकच झुंबड उडाली. यामुळे धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी तर झालीच, शिवाय पर्यटकांनी उभ्या केलेल्या वाहनांच्या लांबच- लांब रांगांमुळे पोलिसांना दुपारी अडीचच्या सुमारास रस्ता बंद करावा लागला.
भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर देखील अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे धरणाच्या पायऱ्यांकडे जाताना पर्यटकांना जवळपास तीन फूट पाण्यातून जावे लागत होते. भूशी धरणाच्या सांडव्यावरुन वाहात असलेले पाणी आणि परिसरातील सर्वच डोंगरावरुन मोठया प्रमाणात धबधबे वाहू लागल्याने पाण्यात भिजण्यासाठी पर्यटकांमध्ये जणू चढाओढ लागली होती. मोठया संख्येने पर्यटक आल्याने दुपारनंतर भुशी धरण व ‘लायन्स पाँईट’वर खचाखच गर्दी झाली होती. शनिवापर्यंतच्या ४८ तासांत लोणावळ्यात ३७७ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी २४ तासात १६३ मिमी, तर शनिवारी २१४ मिमी पाऊस झाला आहे. पावसाची संततधार कमी होण्याचे नाव घेत नसल्याने कार्ला, मळवली, वाकसई भागात रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचून रस्ते बंद झाले आहेत.

भुशी धरणावर पर्यटकांची झुंबड
* लोणावळ्यातील धुवांधार पावसाने पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरण रविवारी पहाटे ‘ओव्हर फ्लो’ झाले.
* धरणाच्या सांडव्यावरुन मोठया प्रमाणात पाणी वाहू लागले असून रविवारी या ठिकाणी पर्यटकांची एकच झुंबड उडाली.
* यामुळे धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी तर झालीच, शिवाय पर्यटकांनी उभ्या केलेल्या वाहनांच्या लांबच- लांब रांगांमुळे पोलिसांना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा रस्ता बंद करावा लागला.