Lonavala Resort Staff Beaten due to Mutton Shortage: हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर एखादा पदार्थ संपले असेल तर आपण मारहाण करतो का? पण लोणावळ्यात असा प्रकार घडला आहे. मुंबईपासून ८४ किमीवर असलेल्या वाकसई येथील झेस्टिन हिल रिसॉर्ट येथे १५ जण गेले होते. २६ मार्च रोजी जेवणाला मटण ऑर्डर करण्यावरून झालेला वाद पुढे मारहाणीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
नेमके प्रकरण काय?
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आता हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. १५ पैकी पाच आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलुंडमधील वैभव वैती, ठाण्यातील स्मित वेनी आणि राज नाईक, भावेश वाईंगणकर आणि ललित वैती यांची ओळख पटलेली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात रिसॉर्टच्या चालक साधना मोहन भोईर यांनी गुन्हा दाखल केला आहे. भोईर यांनी सांगितले की, मुंबईहून १५ जणांचा ग्रुप रिसॉर्टमध्ये आला होता. २६ मार्चच्या दुपारी ग्रुपने जेवणासाठी मटणाची ऑर्डर दिली. मात्र रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी मटण संपल्याचे सांगताच ग्रुपमधील काही जणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
ग्रुपमधील एका व्यक्तीने साधना भोईर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचे डोके प्लास्टिक खुर्चीवर आपटले. त्यानंतर त्यांनी जेवण बनविणारा आचारी महेश आणि मदतनीस संदीप आणि नितीन यांना मारहाण केली. एवढेच नाही तर या टोळक्याने सौरभ गोरे नावाच्या आणखी एका कर्मचाऱ्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यापैकी गोरे यांच्या पोटावर आणि कमरेवर मार लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोरे यांच्या मूत्राशयाला जबर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
