पिंपरी-चिंचवड: नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या जागा वाटपाचा आणि नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला मामा माजी मंत्री बाळा भेगडे आणि भाचे आमदार सुनील शेळके यांनी ठरवला आहे. तशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला ठरल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
लोणावळा, तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी सोबत लढणार आहेत. वडगाव मावळ नगर पंचायतीचादेखील यात समावेश आहे. दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे अडीच वर्षांसाठी भाजपकडे असणार असून संतोष हरिभाऊ दाभाडे हे अडीच वर्षे नगराध्यक्ष राहतील आणि उर्वरित अडीच वर्षे हे गणेश काकडे पदभार सांभाळतील अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
शेळके म्हणाले, लोणावळ्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे अडीच वर्षे नगराध्यक्ष राहतील आणि उर्वरित अडीच वर्षे भाजपचा नगराध्यक्ष असेल. पुढे ते म्हणाले, आमचा जागा वाटपाचादेखील फॉर्म्युला ठरला आहे. तळेगाव दाभाडे येथे एकूण २८ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादी आणि ११ जागांवर भाजपचे उमेदवार लढतील. हा सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचे आमदार सुनील शेळके म्हणाले.
