पर्यटनस्थळी गर्दी करू नका त्यामुळं करोनाचा संसर्ग वाढत आहे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील नागरिकांना केले होते. परंतु, त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत लोणावळा येथील भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, लोणावळा शहर पोलिसांकडून पर्यटकांना तिथे येण्यास मज्जाव केला जात असला, तरी देखील पुणे आणि मुंबईमधून मोठ्यासंख्येने पर्यटक येत आहे. परिणामी आलेल्या या पर्यटकांन परत पाठवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.

लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत आहे. शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्यासंख्येने पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट यासह इतर पर्यटनस्थळी बंदी झुगारून गर्दी करत आहेत. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. तरी देखील पर्यटक येत असल्याने लोणावळा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पहाटेपासूनच पोलिसांना नाकाबंदी करावी लागत आहे. मात्र, पर्यटक हे पोलिसांची नजर चुकवून, खोटं बोलून भुशी धरणाकडे जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

गर्दी होत असल्याचे पाहून लोणावळा पोलिसांनी भुशी धरणावरील पर्यटकांना हुसकावून लावले आहे. दरम्यान, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार पर्यटकांनी पर्यस्थळी गर्दी करू नका आणि शासनाच्या नियमांच पालन करावं असं आवाहन करत असताना, दुसरीकडे त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, नियम डावलून पर्यटक गर्दी करताना दिसत आहे.