नक्की पाहा >> Photos: लोणावळ्यात सेल्फीसाठी जीव धोक्यात टाकून स्टंटबाजी; फोटो पाहून बसेल धक्का
लोणावळा, मावळ या परिसरात मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे धबधबे आणि नद्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटकांची वर्दळ या ठिकाणी वाढली आहे. करोना नियम धुडकावून पर्यटक फिरत असल्याचं चित्र असून पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस बघ्यांची भूमिका घेत आहेत. मावळ परिसरात असणाऱ्या कुंडमळा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असून येथील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यासोबत सेल्फी काढत असल्याचं चित्र आहे. परंतु, हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं.
नक्की पाहा >> लोणावळा : पाऊस, लाँग ड्राइव्ह, धबधबे अन् मक्याचं कणीस… Picnic Day चा परफेक्ट प्लॅन
कुंडमळा येथे रांजण खळगे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. ओसंडून वाहणाऱ्या पाण्यासोबत तरुण, तरुणी अगदी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढत जीव धोक्यात घालत आहेत. दरम्यान, अनेक पालक आपल्या मुलाला घेऊन रांजण खळगे पाहण्यासाठी नदीच्याकडे बसल्याचं तर, काही तरुण मंडळी आपल्या मैत्रिणीसोबत थेट पाण्यात जाऊन खेळत असल्याचं चित्र येथे सामान्य गोष्ट आहे. याठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे. लोणावळ्यातील टायगर पाईंट, लायन्स पॉईंट येथे देखील हुल्लडबाजीमुळे अनेकांचे जीव गेलेत. काही घटनांमध्ये तर सेल्फीच्या मोहापायी जीव गेल्याची उदाहरणे आहेत. असं असतानाही लोकांनी या पूर्वीच्या घटनांमधून धडा घेतल्याचं चित्र दिसत नाही.
नक्की पाहा >> Photos : पोलीस विरुद्ध स्थानिक गोंधळामुळे भुशी डॅमवर पर्यटकांची धावपळ
२०१७ ला स्टंटबाजी जीवावर बेतली होती….
तीन ते चार वर्षांपूर्वी कुंडमळ्यात इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. यात, त्याचा मृत्यू झाला होता. स्टंटबाजी चांगलीच जीवावर बेतली होती. असं असताना अनेक पर्यटक हलगर्जीपणा करत जीव धोक्यात घालत आहेत. अतुल पाटील हा नदीच्या दुसऱ्या बाजूवरून उडी घेत होता, तेव्हा त्याच्या तोल गेला आणि थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याचा हा स्टंट मोबाईलच्या कॅमेऱ्यात छायाचित्राद्वारे मित्रांनी टिपला होता. पर्यटकांनी पर्यटनस्थळी अशी हुल्लडबाजी करु नये असं अनेकदा प्रशासनाकडून सांगण्यात येतं, मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात.