VIDEO: लोणावळ्यात ७० फूट खोल दरीत पडला पर्यटक, जिगरबाज पोलिसांकडून सुटका

पोलीस कर्मचारी कुवर आणि शिंदे हे जीवाची बाजी लावून ७० फूट खोल दरीत खाली गेले

लोणावळ्याच्या लायन्स पॉईंट येथे सेल्फीचा मोह पर्यटकाच्या चांगलाच अंगलट आला होता. निलेश भागवत असं या पर्यटकाचे नाव असून तो ७० फूट खोल दरीत पडला होता. जिगरबाज लोणावळा ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान निलेश हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तो मुंबईमधील मुलुंडचा रहिवासी असून मित्रासह लोणावळ्यात फिरायला आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता मद्यधुंद निलेश आणि त्याचा मित्र हे लायन्स पॉईंट येथे फिरायला आले होते. निलेशने मद्यपान केलं होतं. याच जोरावर त्याने ५०० फूट खोल असलेल्या दरी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचे धाडस केले, मात्र ते त्याच्या अंगलट आले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी शेवाळ झालेले आहे. त्यावरून निलेशचा पाय घसरला आणि तो थेट दरीत पडला”.

निलेशने ७० फुटावर एका झाडाला पकडले. हे दृश्य पाहिल्यानंतर सर्व पर्यटक आरडाओरडा करु लागले. गस्तीवर असलेल्या लोणावळा ग्रामीण पोलिसांना काही पर्यटकांनी तरुण दरीत पडल्याची माहिती दिली. संबंधित पोलीस कर्मचारी तिथे तातडीने गेले. खात्री केली असता तो दरीत लटकल्याचं लक्षात आलं. निलेशला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचारी मयूर अबनावे, हणमंत शिंदे, हुसेन कुवर होमगार्ड शुभम कराळे आणि गणेश गाडे यांनी कंबर कसली.

“पाच जणांनी शेजारील हॉटेलमधून दोरखंड घेतले आणि सर्वांनी एकमेकांच्या कंबरेला बांधत मानवी साखळी केली. पोलीस कर्मचारी कुवर आणि शिंदे हे जीवाची बाजी लावून ७० फूट खोल दरीत खाली गेले. मद्यधुंद निलेशला हातात दोर पकडता येत नव्हती. अखेर कुवर यांनी आणखी खाली जात त्याच्या कंबरेला दोरी बांधून ३५ मिनिटांच्या मेहनतीनंतर निलेशला सुखरूप बाहेर काढले. दरीत सोसाट्याचा वारा सुरू होता त्यामुळे दोन मिनिटंही उशीर झाला असता तर निलेश थेट ५०० फूट खोल दरीत पडला असता”, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

निलेशला वर काढल्यानंतर त्याला शांत होऊ दिले. त्यानंतर त्याला मुंबईला सुखरूप रवाना करण्यात आले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून उतावीळ पर्यटकांमुळे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचे जीव वाचवावे लागत आहेत. पर्यटकांनी स्वतः ची काळजी घेणे गरजेचे असून मद्यपान करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lonavla police rescue tourist stuck in valley sgy

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या