करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी देखील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील दिवे घाटातून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या २२ वारकर्‍यांना, आज(शनिवार) लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्या सर्वांना समजून सांगून, सोडून देण्यात आलं.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षा प्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा स्थगित करून, आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर एसटीच्या माध्यमांतून पालखी थेट पंढरपुरात दाखल केली जाणार आहे. यामुळे यंदा देखील लाखो वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन होणार नसल्याने, हिरमोड झाला आहे. मात्र आम्ही काही झाले, तरी पायी पंढरपूरच्या दिशेने जाणार, असा पवित्रा बंडातात्या कराडकर यांनी काल घेतला आणि ते आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने जाण्यास निघाले. तेवढ्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काही तासांनी त्यांना सोडण्यात देखील आले. ही घटना होत नाही, तोवर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मार्ग असलेल्या दिवे घाटातून काही वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले आहेत, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली.  माहिती मिळताच, पोलिसांनी तिथे जाऊन २२ वारकऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याशी चर्चा केली.

हे सर्वजण पंढरपूरला पायी जाण्यावर ठाम होते. यावर त्या सर्व वारकऱ्यांची पोलिसांनी समजूत काढली, शासनाचे नियम त्यांना समजून सांगितले. अखेर त्यांनी आम्ही पायी जाणार नसल्याचे सांगितल्यावर त्यांना सोडण्यात आल्याचे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही दिवे घाट परिसरात पेट्रोलिंग वाढविले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.