निधीच्या पळवापळवीने विकासकामांना खो

विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीचा अंदाज न घेता करण्यात आलेल्या अपुऱ्या तरतुदीमुळे कामे पूर्ण करण्यासाठी योजना किंवा प्रकल्पांतून निधी घ्यावा लागत असल्याने शहरातील विकासकामे ढेपाळली आहेत.

कामे रखडल्याची प्रशासनाची कबुली, फलनिष्पत्ती अंदाजपत्रक तयार करण्याची खात्यांना सूचना

पुणे : विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीचा अंदाज न घेता करण्यात आलेल्या अपुऱ्या तरतुदीमुळे कामे पूर्ण करण्यासाठी योजना किंवा प्रकल्पांतून निधी घ्यावा लागत असल्याने शहरातील विकासकामे ढेपाळली आहेत. तशी स्पष्ट कबुलीच महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षीचे अंदाजपत्रक करताना खातेप्रमुखांनी जमा-खर्चाच्या अंदाजाबरोबर (होणारी कामे आणि न होणारी कामे) फलनिष्पत्ती (आउटकम बजेट) सादर करण्याची सूचना खाते प्रमुखांना देण्यात आली आहे. निधीच्या पळवापळवीने विकासकामे रखडत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

करोना संसर्गामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर वित्तीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही विविध खात्यांकडून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात अन्य प्रकल्प किंवा योजनांसाठी राखीव असलेला निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव देऊन घेतला जात आहे. त्याचा परिणाम मोठय़ा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर होत आहे. त्यामुळेच आयुक्त विक्रम कुमार यांनी परिपत्रक काढून खातेप्रमुखांना सूचना करताना विकासकामांवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

चालू आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक करताना गेल्या वर्षीच्या अपूर्ण कामांसाठी आवश्यक तरतुदी करण्याबाबतची सूचना आयुक्तांनी खातेप्रमुखांना केली होती. मात्र अपुऱ्या आर्थिक तरतुदीमुळे अंदाजपत्रकावर तरतुदींचे अतिरिक्त दायित्व निर्माण करावे लागत आहे. तसेच अनेक तरतुदींची वर्गीकरणे होत आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. 

प्रकल्प किंवा योजना राबविताना खात्याला अनेक वेळा निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या कामांसाठी राखीव असलेल्या निधीतून काही रक्कम देण्याचे प्रस्ताव स्थायी समितीला देण्यात आले आहेत. असे प्रस्ताव मंजूर केले जात असल्यामुळे अन्य कामांवर परिणाम होत आहे. एका योजनेचा निधी दुसऱ्या योजनेसाठी देण्याचा पायंडा पडला आहे. नगरसेवकांकडूनही प्रभागात विकासकामे करण्यासाठी योजना किंवा प्रकल्पांचा निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव देऊन मंजूर करून घेतला जात आहे. त्याचा परिणाम अंदाजपत्रकावर होत असल्याचे दिसून येत आहे.

पंचवार्षिक आराखडा

खात्याने विकासकामे, योजनांचा र्सवकष आढावा घेऊन जुन्या योजना, अपूर्ण विकासकामे, सुरू न झालेली कामे, न होणाऱ्या कामांबरोबरच योजना सुरू ठेवायची किंवा नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. नवीन योजनांसंदर्भात ढोबळ आराखडा करून विकासासाठी आवश्यक योजनांसाठी पंचवार्षिक आराखडा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

खातेप्रमुखांना सूचना

निश्चित केलेली कामे तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी किती तरतूद करावी लागणार आहे, त्याची माहिती फलनिष्पत्ती अंदाजपत्रकात द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रभागातील एका विभागासाठी एकूण कमाल तरतूदीची मर्यादा २५ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. नव्या कामांसाठी पूर्वगणन पत्रक (इस्टिमेट) करून या कामांवर दुरुस्तीचा खर्च किमान तीन महिने येणार नाही, याची दक्षता घ्यावी. जागा ताब्यात आहेत किंवा महापालिकेच्या मालकीच्या आहेत, हे लक्षात घेऊनच कामे सुचविण्यात यावीत. फलनिष्पत्ती अंदाजपत्रक मुख्य लेखा आणि वित्त विभागाकडे सादर करावे. योजनांची उद्दिष्टं निश्चित करावीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loss development work funds ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या