चोरटय़ांनी लव्ह बर्ड, आफ्रिकन पोपटही लांबवला
सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरटे हातोहात लांबवितात. मौल्यवान ऐवजावर चोरटय़ांचे लक्ष्य असते. पण तळेगाव दाभाडे भागात एका घरात शिरलेल्या चोरटय़ांनी चक्क चाळीस लव्ह बर्ड आणि आफ्रिकन पोपट लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.




सुदर्शन म्हाळस यांनी या संदर्भात तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांकडून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन म्हाळस हे रावेत येथे राहतात. त्यांचे तळेगाव दाभाडेनजीक असलेल्या आढले बुद्रुक गावात घर आहे. गावातील घरात सुदर्शन यांचे वडील राहायला आहेत. गेल्या महिनाभरापासून ते आजारी आहेत. त्यामुळे सुदर्शन वडिलांना घेऊन रावेत येथे आले.
महिनाभरापासून सुदर्शन यांचे आढले बुद्रुक गावातील घर बंद होते. आठवडय़ातून एकदा ते गावातील घराची पाहणी करण्यासाठी जात होते. ते घराची साफसफाई करून पुन्हा रावेतला जायचे. सुदर्शन चौदा जानेवारी रोजी गावी गेले होते. घराची साफसफाई करून ते पुन्हा रावेत येथे आले. त्यानंतर दहा दिवसांनी गावातील शेजाऱ्यांनी सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला आणि घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती त्यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने गावी रवाना झाले.
गावातील घराची पाहणी त्यांनी केली, तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शन आले. घरातील एलईडी दूरचित्रवाणी संच, फ्रीज असे गृहोपयोगी साहित्य चोरून नेल्याचे उघडकीस आले. सुदर्शन यांनी हौसेने लव्हबर्ड आणि आफ्रिकन पोपट पाळला होता. चोरटय़ांनी चाळीस लव्ह बर्ड ठेवलेला पिंजरा तसेच आफ्रिकन पोपट ठेवलेला पिंजरा चोरून नेल्याचे उघडकीस आले. सुदर्शन यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाजीगरे तपास करत आहेत.
श्वान आणि घुबडांच्या चोरीचीही तक्रार
काही महिन्यांपूर्वी हडपसर भागातून एकाचे पाळीव श्वान चोरीला गेले होते. या प्रकरणी एकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण श्वानचोरटय़ाचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून वर्षभरापूर्वी शृंगी जातीचे घुबड चोरीला गेले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्मीळ प्रजातीचे पक्षी पाळण्याचा अनेक बडय़ा असामींना शौक आहे. अगदी काही दुर्मीळ प्रजातीच्या पक्ष्यांची किंमत एक लाखांच्या पुढे असते.