प्राची आमले

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता समाजातील वंचित व गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करण्याऱ्या संस्थेविषयी..

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर  ही समाजमाध्यमे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. समाजातील वंचित व गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करणाऱ्या ‘लव्ह केअर शेअर’ या संस्थेनेदेखील या समाजमाध्यमांचा प्रभावीपणे वापर केला आहे.

‘लव्ह केअर शेअर’ या संस्थेची स्थापना २०१६ साली एका सात मित्रांच्या गटाने सुरू केली. सुरुवातीच्या काळात अनाथ आश्रमांना भेटी देणे, त्या मुलांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्या समस्येवर काम करण्यास सुरुवात केली. हे काम करत असताना शाळा आणि महाविद्यालयातून कामाला प्रतिसाद मिळाला व अल्पावधीतच समाजमाध्यमांवर लोकप्रिय झाली.

संस्थेचा प्रचार आणि प्रसार होण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. याविषयी संस्थेचे स्वयंसेवक पियुष शहा म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही फक्त शहरासाठी काम करत होतो. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम या माध्यमांची लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी खूप मदत झाली. समाजमाध्यमांवर विविध उपक्रमांची माहिती देणे तसेच प्रत्येक स्वयंसेवकाने माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किमान आपल्या तीन मित्रांना टॅग करणे आणि ती माहिती पुढील तीन लोकांनी आपल्या तीन मित्रांपर्यंत पोहोचवणे (टॅग थ्री पिपल) अशी चळवळ समाजमाध्यमांवर सुरू केली. प्रत्येक उपक्रमाचे हॅश टॅग यामुळे परदेशातूनही लोकांचा याला प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या नावाप्रमाणे सर्व क्षेत्रात संस्था कार्यरत आहे. केरळमधील पूरग्रस्त नागरिकांना मदत, रक्तदान शिबिर, अनाथ आश्रमातील मुलांना आकाश निरीक्षण, अवयव दानाविषयी जनजागृती, फराळ- कपडय़ांचे वाटप, दिव्यांग व्यक्तींसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम यांसारख्या उपक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येते. सध्या संस्थेचे शंभरहून अधिक स्वयंसेवक आहेत. आपल्या प्रिय व्यक्तींविषयी फक्त लव्ह, केअर आणि शेअरची भावना न जपता समाजातील प्रत्येकांसाठी ही भावना टिकवून ठेवणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. ज्या विषयांवर लोकांमध्ये मोकळेपणाने बोलले जात नाही असे विषय निवडून त्या विषयावर जनजागृती करण्यासाठी पथनाटय़, कविता वाचन, स्टँड अप कॉमेडी अशा विविध माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती केली जाते. दरवर्षी छायाचित्रकारांसाठी विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाचे क्षण या नावाने एक संकेतस्थळ देखील सुरू आहे.

सध्या लव्ह केअर शेअर या नावाने संस्थेचे फेसबुक, इन्स्टाग्राम पेज आहे. संस्थेच्या अधिक माहितीसाठी व उपक्रमात सहभागी होण्यासाठी ७३८७३५७३५३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.