पुणे : धर्मांतरविरोधी कायदा असताना ‘लव्ह जिहाद’ हा नवा कायदा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून मुस्लीम सत्यशोधक मंडळाने हा कायदा राज्यघटना विरोधी असल्याची टीका केली आहे. ‘धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्मिती करण्यासाठी समान नागरी कायदा आल्यास मंडळ त्याचे स्वागत करेल,’ अशी भूमिका मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी सोमवारी मांडली. धर्मांतरविरोधी कायदा हा केवळ शत्रुभाव वाढविण्यासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केला जात असल्याचा आरोप तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
जबरदस्तीने, प्रलोभन दाखवून, धमकावून किंवा फसवून करण्यात येणारे धर्मांतर हे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार बेकायदा आणि गुन्हेगारी वर्तन आहेच. मग वेगळा धर्मांतरविरोधी कायदा कशासाठी. एकीकडे घरवापसीला समर्थन देताना तथाकथित लव्ह जिहादच्या नावाने अपप्रचार करून मुस्लीम समाजाविरुद्ध वातावरण तापविण्याचा हा एक भाग आहे.