पिंपरी-चिंचवड : भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे पिंपरीतील भाजपसोबत एकनिष्ठ असलेल्या एका कार्यकर्त्याने फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केले आहे. भाजपमधील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या ‘इनकमिंग’मुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेला जुना कार्यकर्ता पिचला आहे, हे या फेसबुक पोस्टमधून दिसून येते.
पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या अमोल थोरात यांनी ही पोस्ट लिहिली आहे. थोरात यांच्या पोस्टमुळे शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे?
भाजप पक्ष हा विचारांवर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभा आहे, लाभाच्या राजकारणावर नाही. त्यामुळे, वरिष्ठ नेत्यांनी खऱ्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी आवश्यक पाऊले उचलली पाहिजेत.
पुढे ते म्हणतात, “जिथे गूळ असतो, तिथे मुंग्या येतात. भाजपमध्येही तीच परिस्थिती आहे. सत्ता आहे, म्हणून पक्षात ‘इनकमिंग’ (नवीन लोकांचे आगमन) सुरू आहे. भाजपात आमदार, खासदार, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना शिव्या घालणाऱ्यांना ‘कट्टर भाजप कार्यकर्ता’ म्हणून दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. भाजपातून निवडणूक जिंकता येते, म्हणून अनेक जण पक्षात येत आहेत. पण, जर यांना उमेदवारी मिळाली नाही, तर हेच लोक पक्षासाठी काम करतील का? तेव्हा भाजपला कळेल की खरा एकनिष्ठ कोण.”
ते पुढे म्हणाले, “जुन्या कार्यकर्त्याला किंमत उरलेली नाही. सत्ता असो वा नसो, कठीण काळातही भाजपसोबत ‘पक्ष प्रथम आणि मी द्वितीय’ या तत्त्वावर चालणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत. हे सर्व बघून वरिष्ठांनी निर्णय घ्यावेत, कारण सत्ता बदलते, पण निष्ठा नाही,” असे आवाहन फेसबुक पोस्टद्वारे करण्यात आले आहे. या पोस्टची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.
