पुणे : एलपीजी सिलिंडर टंचाईमुळे वितरकांच्या कार्यालयांबाहेर नागरिकांच्या लांबचलांब रांगा दिसून येत आहेत. आता जिल्हा प्रशासनाने चार दिवसांत घरपोच सिलिंडरचे वितरण करण्याचे निर्देश गॅस कंपन्या आणि वितरकांना दिले आहेत. मात्र, अनेक ग्राहकांनी रिकामा सिलिंडर नसतानाही नोंदणी केल्यामुळे त्यांना पुरवठा कसा करणार, असा प्रश्न एलपीजी वितरकांसमोर निर्माण झाला आहे. याचवेळी ई-केवायसी काही ग्राहकांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात युद्ध सुरू केल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या टंचाईची स्थिती निर्माण झाली. यामुळे ग्राहकांकडून सिलिंडरसाठी मोठी मागणी नोंदविण्यास सुरूवात झाली. अनेक वितरकांकडे ही मागणी अडीच ते तीन पटीने वाढली. यामुळे वितरकांसमोर सिलिंडर वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण वितरक त्यांच्या क्षमतेपेक्षा २० ते ३० टक्के अधिक सिलिंडरचे वितरण करू शकतात. यामुळे सिलिंडर वितरणाला विलंब होऊ लागला. याचाच परिणाम होऊन वितरकांच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या.

आता सिलिंडरची मागणी पूर्वपदावर आली आहे. टंचाईच्या आधी असलेली सरासरी मागणी वितरकांकडे नोंदविण्यात येत आहे. काही वितरकांकडे तर सरासरीपेक्षा कमी मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, आता वितरणात आणखी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक ग्राहकांनी त्यांच्याकडे रिकामा सिलिंडर नसताना मागणी नोंदविली. आता या ग्राहकाच्या घरी सिलिंडर वितरणासाठी गेल्यानंतर त्याच्याकडे रिकामा सिलिंडर नसतो. त्यामुळे वितरण कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो आणि वितरणही होत नाही, असे एलपीजी वितरकांनी सांगितले.

ई-केवायसी बंधनकारक
अनेक ग्राहकांकडून अचानक गॅस सिलिंडरची मागणी नोंदविण्यात येत आहे. वर्षभरापासून एकही सिलिंडर न घेतलेले ग्राहक मागणी नोंदवत आहेत. अशा ग्राहकांसाठी आता गॅस कंपनीने नवीन नियमावली लागू केली आहे. नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत एकही सिलिंडर घेतला नसेल अशा ग्राहकांना वितरकाकडे येऊन ई-केवायसी करावी लागेल. त्यानंतरच त्याला सिलिंडर मिळेल, असे एलपीजी वितरकांनी स्पष्ट केले.

विलंबाचे मुख्य कारण

गेल्या काही दिवसांत सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात रिकामा सिलिंडर उपलब्ध नसलेल्या ग्राहकांची संख्या सुमारे ३० टक्के आहे. त्यांच्याकडे सिलिंडर उपलब्ध नसतानाही भीतीने त्यांनी नोंदणी केली होती. या ग्राहकांकडे सिलिंडर वितरणाचा अयशस्वी प्रयत्न आम्हाला करावा लागतो. त्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो. याचाच परिणाम होऊन इतर गरज असलेल्या ग्राहकांना सिलिंडर वितरणास विलंब होतो, असे एलपीजी वितरकांनी नमूद केले.