दुर्घटनेनंतर विमा संरक्षणापासूनही वंचित

प्रत्येकाच्या स्वयंपाकगृहात असणारा एलपीजी सिलिंडर जीवनावश्यक असला, तरी हलगर्जीपणा किंवा तांत्रिक गोष्टींमुळे तो घातकही ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकापासून गॅस कंपन्यांपर्यंत त्याची काळजी आवश्यकच ठरते. सििलडर ते गॅस शेगडी आदी सर्व गोष्टी सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करण्यासाठी दोन वर्षांतून एकदा फक्त ७५ रुपयांची आकारणी केली जाते. मात्र, बहुतांश ग्राहक अनभिज्ञतेमुळे ही सुविधा नाकारत असल्याने धोका निर्माण होण्याबरोबरच छोटी-मोठी दुर्घटना झाल्यास सििलडरच्या विम्यातून मिळणाऱ्या भरपाईपासूनही वंचित राहावे लागत आहे.

गॅस कंपन्या आणि वितरकांकडून एलपीजी सिलिंडरचा विमा काढण्यात येतो. त्यात तृतीय पक्षाचाही (थर्ड पार्टी) समावेश असल्याने त्यात ग्राहकाला मिळणाऱ्या भरपाईचाही समावेश असतो. सिलिंडरचा स्फोट किंवा गॅसजोडाबाबत दुर्घटनेत एखाद्याचा मृत्यू झाला, कुणी जखमी झाले किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांकडून ग्राहकाला त्याची भरपाई मिळते. विम्यातील अटीनुसार मृताच्या वारसास विम्यातील करारानुसार रक्कम, जखमींवर रुग्णालयात झालेल्या खर्चाची परिपूर्ती आणि मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई ‘एलपीजी’च्या विम्यातून मिळण्याची तरतूद आहे.

एलपीजी सिलिंडरबाबत दुर्घटना झाल्यास विम्यातून त्याची भरपाई मिळण्यासाठी ग्राहक पात्र असला, तरी त्याबाबत काही अटी ग्राहकाला पाळाव्या लागतात. गॅस कंपन्या आणि वितरकाकडून ग्राहकाच्या गॅस जोडाची दोन वर्षांतून एकदा तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये आपला गॅसजोड सुरक्षित आहे का, याची पडताळणी केली जाते. या तपासणीसाठी केवळ ७५ रुपये शुल्क आकारले जाते. तपासणीनंतर आवश्यकता असल्यास दुरुस्ती, देखभाल करण्याची सूचना ग्राहकाला केली जाते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक असते. मात्र, वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ग्राहक त्यास तयार होत नाहीत. ही बाब सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. एखादी दुर्घटना झाल्यास आणि ग्राहकाने विम्यासाठी दावा केल्यास नियमित तपासणी होत नसल्याच्या कारणावरून विमा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा व विमा लाभ मिळण्यासाठी तपासणी आणि इतर आवश्यक बाबी ग्राहकांनी पूर्ण कराव्यात, असे आवाहन गॅस कंपन्या आणि वितरकांकडून करण्यात येत आहे.

विमा नाकारला जाऊ नये यासाठी..

  • गॅस जोडाची नियमित तपासणी करण्यासाठी वितरकाला सांगा. तपासणी आणि देखभालही योग्य वेळेला करा. त्याच्या अधिकृत पावत्या जवळ ठेवा.
  • = गॅसजोडासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य ‘आयएसआय’ मानांकित असलेलेच हवे. (शेगडी, लायटर, गॅस पाईप आदी) विम्याची भरपाई मिळविण्यासाठी
  • दुर्घटनेची माहिती पोलीस, गॅस वितरकाला द्या. (विमा कंपनीशी संपर्काची आवश्यकता नाही)
  • दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल.
  • जखमी व्यक्तीवर उपचार झालेल्या रुग्णालयातील प्रमाणपत्र (डिस्चार्ज कार्ड), औषधांची मूळ बिले, डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन).
  • मालमत्तेचे नुकसान झाल्यास कंपन्यांकडून त्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल दिला जातो.

सुरक्षिततेच्या दृष्टीने एलपीजी गॅस जोडाची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. दुर्घटना झाल्यास विम्याचे संरक्षण मिळविण्यासाठी ही बाब आवश्यक आहे. आम्ही याबाबत ग्राहकांमध्ये जागृती करीत आहोत. दोन वर्षांतून एकदा तपासणीसाठी ७५ रुपये शुल्क घेतले जाते. मात्र, बहुतांश ग्राहक ते देत नाहीत. तपासणी हवी आहे का, याची संमती घेणारे अ‍ॅपही विकसित करण्यात आले आहे. त्यावर आम्ही ग्राहकाची डिजिटल स्वाक्षरी घेतो. ‘हो’ किंवा ‘नाही’ असे पर्याय असतात. आवश्यकता पटवून दिली तरीही अनेकजण ‘नाही’ पर्याय निवडून स्वाक्षरी करतात.

उषा पुनावाला, अध्यक्षा, ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन