पुण्यातल्या शिवाजी नगर भागात फूड डिलिव्हरीचं काम करणारे परशुराम कांबळे सांगतात मागच्या आठवड्यात खासकरुन तीन दिवसात येणाऱ्या ऑर्डर फारच कमी झाल्या आहेत. मी रोज १२ तास काम करतो त्यात किमान ३१ ते ३२ ठिकाणी फूड डिलिव्हरी करतो. मागच्या तीन दिवसांत हे प्रमाण १३ ते १५ इतकं म्हणजेच निम्म्यावर आलंय. परशुराम कांबळे मूळचे कोल्हापूरचे आहेत. ते सांगतात मी दिवसाला १६०० रुपये कमवत होतो. मागच्या आठवड्यात ही कमाई ६०० रुपयांवर आली आहे. परशुराम कांबळे यांची पत्नी आणि मुलं कोल्हापूरला आहेत. परशुराम कांबळे जे पैसे पाठवतात त्यावरच त्यांची गुजराण होते. जर परिस्थिती अशीच राहिली तर पुण्यात मला हे काम करणं कठीण होईल असं परशुराम सांगतात. कदाचित मला गावी परतावं लागेल असंही त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. एलपीजी सिलिंडरचा तुटवडा हॉटेल्सना भासू लागला आहे. ज्यामुळे आता स्विगी आणि झोमॅटोची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवरही परिणाम झाला आहे.
पुण्यात हजारो डिलिव्हरी बॉईज
पुण्यात स्विगी, झोमॅटो आणि इतर फूड चेन्सचे हजारो डिलव्हरी बॉईज काम करत आहेत. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासू लागल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. त्याचा परिणाम आता स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्यांनाही होतो आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडर पुरवठ्यावर इराण इस्रायल युद्धामुळे मर्यादा लादल्या गेल्या आहेत. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतो आहे. पुण्यातल्या हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये कमी प्रमाणात अन्न तयार केलं जातं आहे किंवा हॉटेल्स आणि रेस्तराँ बंद ठेवण्याची वेळ आली आहे.गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ऑनलाइन ऑर्डर स्वीकारण्यावरही मर्यादा आल्या आहेत. ज्याचा परिणाम स्विगी- झोमॅटो या ऑनलाइन डिलव्हरी करणाऱ्या कंपन्यांना भासू लागला आहे. जी स्थिती परशुराम कांबळेंची आहे तशीच अनेकांची आहे. येत्या काळात तुटवडा वाढला तर हे संकट आणखी गहिरं होईल अशी स्थिती आहे.
हिंजवडीत डिलिव्हरीचं काम करणाऱ्या लकी अदेने काय सांगितलं?
हिंजवडीत फूड डिलिव्हरी करणाऱ्या लकी अदेने सांगितलं की तो त्यांच्या भागात साधारण नऊ हॉटेल आणि क्लाऊड किचन जे फूड डिलिव्हरीच्या ऑर्डर घेत होते ते बंद झाले आहेत. सिलिंडरचा तुटवडा भासल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. मी १० तासांमध्ये ३० ते ३५ ऑर्डर करायचो मंगळवारपासून १३ तास काम करुनही जेमतेम १८ ते १९ ऑर्डर आल्या आहेत. मी दिवसला १८०० रुपये कमवत असे. आता माझं दिवसाचं उत्पन्न थेट ८०० रुपयांवर आलं आहे. काही काही जणांना ऑर्डर्स मिळत आहेत. पण अनेकांवर अशी स्थिती आहे की आज मिळालेली ऑर्डर आहे पण उद्या मिळेल की नाही याची शाश्वती नाही असं लकीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

सागर देवकर या डिलिव्हरी बॉयने काय सांगितलं?
सागर देवकर हा नारायण पेठेत डिलिव्हरीचं काम करतो. त्याने सांगितलं मी जे पैसे कमावतो त्यावर माझं कुटुंब चालतं. माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी हे सगळेजण माझ्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. माझी मुलं ज्युनिअर केजी आणि सिनीयर केजीमध्ये आहेत. हे संकट असंच कायम राहिलं तर मात्र शाळेची फी कशी भरायची हा प्रश्नही माझ्यासमोर निर्माण होईल. स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या कंपन्यांना गॅस सिलिंडर तुटवड्याचा फटका बसला आहे.
