scorecardresearch

जमीन मोजणीसाठी जिल्ह्याला दहा यंत्रे; शिरूर, मावळ, पुरंदर, दौंड तालुक्यात मोजणी स्थानके

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनीची ३० सेकंदात अचूक मोजणी करणारे रोव्हर (यंत्र) खरेदी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनीची ३० सेकंदात अचूक मोजणी करणारे रोव्हर (यंत्र) खरेदी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामध्ये दहा रोव्हर पुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे जमीन मोजणीची प्रक्रिया जलदगतीने होणार असून प्रलंबित मोजणी अर्जाची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यात चार ठिकाणी मोजणी स्थानके उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील जमीन मोजणी करण्यात येणार आहे.

जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या मदतीने स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) उभारली आहेत. या स्थानकांच्या आधारे जीपीएस मोजणी केवळ ३० सेकंदात घेता येणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये (यंत्र) संकलित होणार असून पडद्यावर (टॅब) हे आकडे दिसणार आहेत. पुणे जिल्ह्यात दहा रोव्हर खरेदी केले जाणार असून जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीडीसी) ९८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जमीन मोजणीसाठी सध्या भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जीपीएस रीडिंग ३० सेकंदात घेता येते, असे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

मोजणीला वेग

पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, दौंड आणि पुरंदर तालुक्यात चार ठिकाणी ही मोजणी (कॉर्स) स्थानके उभारण्यात येणार आहेत. एका स्थानकामुळे सभोवतालचा ३५ किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग घेणे शक्य होणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हरमध्ये संकलित होणार असून हे आकडे पडद्यावर टॅबमध्ये दिसणार आहेत. स्थानकांचे काम जवळपास पूर्णत्वाला आले असून मोजणी यंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील जमीन मोजणीला वेग येणार असल्याचेही जमाबंदी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Machines land survey district counting stations modern technology ysh

ताज्या बातम्या