पुणे : कात्रज भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी टोळीप्रमुख साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतिफ बागवान (वय २३), रेहान सीमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख (वय १९), अब्दुलअली जमालउद्दीन सैय्यद (वय १९), संकेत किशोर चव्हाण (वय १८), ऋतिक चंद्रकांत काची (वय २१, सर्व रा. कात्रज), एक अल्पवयीन मुलासह अकरा जणांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपी रेहान शेख, अब्दुलअली सय्यद, संकेत चव्हाण, ऋतिक काची यांना अटक करण्यात आली आहे. टोळी प्रमुख लतिफ बागवान याच्यासह सहाजणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
हेही वाचा – पुणे: मालमत्तेच्या व्यवहारातील दलालीच्या वादातून कोंढव्यात एकावर खुनी हल्ला
कात्रज भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकावर बागवान आणि साथीदारांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून दहशत माजविली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी रिक्षाचालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बागवान आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बागवान आणि साथीदारांविरुद्ध खंडणी मागणे, जबरी चोरी, दुखापत करणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. बागवान टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक वैभव गायकवाड यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला हाेता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली.