पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये परिवर्तन घडून येताच साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला माजी कार्याध्यक्षा डाॅ. माधवी वैद्य यांनी गुरुवारी दशकभरानंतर परिषदेच्या वास्तूमध्ये पाऊल ठेवले. ‘परिषद ही कोणाची जहागिरी नाही’, अशी टिप्पणी करून ‘प्रेमाची अडीच अक्षरे काही आपल्याच्याने बोलवत नाहीत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘आपले आयुष्य छोटे असते. मात्र, संस्था चिरंतन असतात. अनेक दिग्गजांनी संस्थेमध्ये योगदान दिले आहे. तुम्ही परिषदेवर प्रेम करा. परिषद तुमच्यावर प्रेम करेल,’, असा सल्ला देत वैद्य यांनी ‘सर्वांगीण प्रगतीसाठी मसापचा प्रवास ‘मी’कडून ‘आम्ही’च्या दिशेने व्हावा, हा कानमंत्र नव्या पदाधिकाऱ्यांना दिला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ‘पुस्तकांची गुढी’ उभारून नूतन कार्यकारणीच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्याप्रसंगी डाॅ. माधवी वैद्य यांनी दहा वर्षांनंतर मन मोकळे केले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते.
‘मराठी भाषेसाठी काळ सोपा राहिलेला नसून ‘कॅच देम यंग’ हे बिरूद विसरून अगदी लहापणापासूनच मुलांना मराठी भाषेची गोडी लावणे आवश्यक आहे. नव्या कार्यकारिणीकडून लहान मुलांसाठी चांगला उपक्रम प्रस्तावित झाल्यास त्याची पहिली देणगीदार माधवी वैद्य असेल,’ अशी घोषणा वैद्य यांनी केली. मराठीतील अभिजात साहित्य इतर भाषांमध्ये जाण्यासाठी अनुवादाच्या कामाला पाठबळ दिले पाहिजे, ही अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. ‘मी कार्याध्यक्ष असताना म. श्री. दीक्षित आजारी होते, तेव्हा ‘परिषदेला अंतर देऊ नका’ असे वचन त्यांनी माझ्यासह सुनील महाजन यांच्याकडून घेतले होते. त्या वचनातून आम्ही मुक्त होत आहोत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘नव्या कार्यकारिणीने आपल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त शोधला आहे. शंभरावे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी परिषदेने अधिक जोमाने काम करावे,’ अशी अपेक्षा डाॅ. मोरे यांनी व्यक्त केली.
‘संकल्प जाहीर करण्याचे मी दहा वर्षांपासून सोडून दिले आहे. संकल्प मनात करतो. ज्याचा मी एकमेव साक्षीदार असतो. पण, केलेला संकल्प पूर्णत्वास गेला की नाही हे मी पुढच्या गुढीपाडव्याला सांगेन,’ असे सोमण यांनी सांगितले. ‘प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने सध्या मी बोलण्यापेक्षा सर्वांचे ऐकण्याचे काम करणार आहे. साहित्यवारीचे वारकरी या नात्याने शंभरावे आणि १०१ वे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण सगळे एकदिलाने काम करूया,’ असे आवाहन त्यांनी केले.
नवीन कार्यकारिणीने मला इथे सन्मानपूर्वक बोलवले. त्यांची मी कृतज्ञ आहे. कृतज्ञता आणि कृतघ्नता यांतील फरक ओळखून जो मनुष्य कृतज्ञतेने वागतो, त्यालाच खरा माणूस म्हणावे, येथे येण्यासाठी मी आसुसले होते. – डाॅ. माधवी वैद्य, माजी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
