पुण्यात सुरू झालेल्या स्थानिक संस्था कराला असलेला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध मंगळवारी काढण्यात आलेल्या महामोर्चातून व्यक्त झाला. महापालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चात व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती होती आणि शहरातील सर्व बाजारपेठाही दिवसभर बंद राहिल्या होत्या. कराच्या विरोधात सुरू झालेला बेमुदत बंद बुधवारीही सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सोमवारपासून सुरू झाला असून या कराच्या विरोधात मंडई ते पुणे महापालिका असा मोर्चा मंगळवारी काढण्यात आला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, फत्तेचंद रांका, सूर्यकांत पाठक, महेंद्र पितळीया, मुलरीभाई शहा, हेमंत शहा, घनश्याम सुराणा यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात शहरातील सर्व व्यापारी संघटनांची उपस्थिती होती.
व्यापारी संघटनांचे निवेदन महापौर वैशाली बनकर यांनी स्वीकारले. त्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त महेश पाठक यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. महापालिका भवनाबाहेर झालेल्या सभेत एलबीटी रद्द होईपर्यंत बेमुदत बंद सुरूच राहील, असे ओस्तवाल यांनी सांगितले. व्यापाऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली जात असल्याचेही ते म्हणाले. सुटसुटीत करप्रणाली न आणता एलबीटी सारखा जाचक कर लादला जात आहे. अशा करप्रणालीमुळे व्यापार करणेच अवघड होईल, असेही त्यांनी सांगितले. ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया, अनिल वासुलकर, दिलीप नारंग, जयूज ठाकूर, रतन किराड, प्रकाश जैन आदींची या वेळी भाषणे झाली.
लक्ष्मी रस्त्यावर आज मानवी साखळी
एलबीटीच्या विरोधात टिळक चौक, लक्ष्मी रस्ता ते कॅम्पपर्यंत बुधवारी व्यापाऱ्यांतर्फे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता टिळक चौकात या कार्यक्रमाला प्रारंभ होईल.
िपपरीत दुसऱ्या दिवशीही बंद
एलबीटीच्या निषेधार्थ िपपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या ‘व्यापार बंद’ आंदोलनाला मंगळवारी, दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. किरकोळ अपवाद वगळता शहरातील बाजारपेठा, दुकाने बंदच ठेवण्यात आल्याचे दिसून आले.
एलबीटीच्या विरोधात खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापारी संघटनांनी व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे. ‘एलबीटी हटाव, व्यापारी बचाव’ ही मुख्य मागणी आहे. व्यापार बंदमुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे. एलबीटीसंदर्भात व्यापारी व उद्योजकांमध्ये काही प्रमाणात शंका जरूर होत्या, त्याचे निरसन करण्यात आल्याचे आयुक्तांनी सोमवारीच स्पष्ट केले आहे.
एलबीटीची घडी बसण्यासाठी सुरूवातीचे काही महिने जातील. मात्र, त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल. प्रारंभी अपेक्षित उत्पन्न मिळणार नसले, तरी त्याचा विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही. जकात नाकी बंद करण्यात आली असली, तरी काही काळ एस्कॉर्ट सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात तेथे कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. मात्र, वाहनांच्या तपासणीचे काम ते करणार नाहीत. पालिका सभागृहात व्यक्त करण्यात आलेल्या भावनांची दखल घेण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
पिंपरीत नगरसेवकांसाठी कार्यशाळा
महापालिकेच्या वतीने बुधवारी दुपारी तीन वाजता चिंचवडच्या अॅटो क्लस्टर येथे नगरसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी व जकात अधिक्षक अशोक मुंढे नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक
पुणे आणि पिंपरीत सुरू झालेल्या बेमुदत बंदची दखल राज्य शासनाने घेतली असून पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना शासनाने बुधवारी (३ एप्रिल) दुपारी चार वाजता मुंबईत चर्चेसाठी बोलावले आहे. आमदार मोहन जोशी यांनी मंगळवारी विधानपरिषदेत एलबीटीतील जाचक अटी हटविण्याची मागणी या बैठकीत केली जाईल,असे सांगितले. तसेच, जोपर्यंत राज्य शासन लेखी स्वरुपात निर्णय देत नाही, तोपर्यंत बंद सुरू राहील, असे महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.