पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) दुसऱ्या टप्प्यातील रामवाडी ते वाघोली मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाला गती मिळाली आहे. महामेट्रोने प्रकल्पासाठी निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर साडेतीन वर्षांत मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खराडी, विमाननगर परिसरातील आयटी कंपन्यांना तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे-अहिल्यानगर रस्ते मार्गावरील विमाननगर, खराडी, वाघोली या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पूर्वेकडून शहराकडे ये-जा करणारी वाहतूक मंद गतीने होत असून, प्रामुख्याने याचा फटका पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या हवाई प्रवाशांना बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर रामवाडीपासून पुढील मेट्रो मार्ग वाघोलीपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी करण्यात येत होती. महामेट्रोने दीड वर्षांपूर्वी तीन हजार ६२४ कोटी रुपयांच्या तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाला राज्य आणि अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. मात्र, मधल्या काळात या मार्गावरच सहा पदरी उन्नत रस्ते मार्ग प्रस्तावित करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाने एमएसआयडीसी अंतर्गत हा रस्ते प्रकल्प करण्याचे निश्चित केल्याने महामेट्रोच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. दरम्यानच्या काळात पंचायत समिती, नगरपरिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली होती, असे स्पष्टीकरण महामेट्रोकडून देण्यात आले.
एमएसआयडीसी आणि महामेट्रो एकत्रित प्रकल्प साकारणार आहे. त्यानुसार महामेट्रोने तातडीने निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे. महामेट्रोने ११.६३ किलोमीटर लांबीच्या उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिका ही एमएसआयडीसीच्या सहा पदरी उड्डाणपुलावरून (डबलडेकर) प्रस्तावित आहे. यामध्ये ११ स्थानकांचा समावेश असून मुख्य मार्ग अहिल्यानगर रस्त्याच्या मार्गानेच जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
मार्गिकेचे काम आणि स्थानकेश
महामेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पानुसार पहिल्या टप्प्यात रामवाडी ते तुळजाभवानीपर्यंतचा ४.८ किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात आणि ४.७ किलोमीटर अंतर उ्न्नत रस्त्याचा समावेश आहे. यामध्ये चार स्थानकांचे बांधकाम आणि ये-जा करण्याचा मार्ग (रॅम्प) यांचा समावेश आहे. विमाननगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी मार्ग, उबाळेनगर, अप्पर खराडी रस्ता, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी अशी स्थानके प्रस्तावित आहेत.
महामेट्रोने या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी निविदा मागवल्या असून, ४ मार्चपर्यंत निविदेची अंतिम मुदत आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढील साडेतीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या मेट्रो विस्तारामुळे विमाननगर, खराडी, वाघोली या मार्गावर वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल. – चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

