५६ झाडांपैकी फक्त सात झाडे जगली; तिही पाण्याच्या प्रतीक्षेत

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : शहरात महामेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर मेट्रो मार्गात अडथळे ठरणारे शहराच्या विविध भागातील वृक्ष तोडून टाकावे लागणार होते. पण, हे वृक्ष थेट तोडून टाकण्याऐवजी त्याचे तळजाई टेकडीवर पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चांगल्या संकल्पनेची किती वाईट पद्धतीने वाट लागली, हे महामेट्रो आणि वन विभागाच्या प्रशासनाने दाखवून दिले आहे. ५६ झाडांपैकी फक्त सात झाडेच जगली आहेत अन् तिही आता पाण्याविना आहेत.

पर्यावरण प्रेमींचा आग्रह आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या आदेशानुसार मेट्रोने तोडल्या जाणाऱ्या झाडांचे तळजाई टेकडीवर पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला. झाडांचे संवर्धन करण्याचा विषय आल्यानंतर वन विभागाने पुढाकार घ्यायला हवा होता. पण, झाले भलतेच. कागदी घोडे नाचवीत वन विभागाने फक्त झाडांसाठी खड्डे खोदण्याची जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी घेतली आणि महामेट्रो प्रशासनाने झाडांचे पुनर्रोपण करायचे, त्यांचे संवर्धन करायचे, पाण्याची व्यवस्था करायची, अशी जबाबदारी निश्चित करण्यात आली. पण, महामेट्रोने आपली जबाबदारी नीट पार पाडली नसल्याने ५६ झाडांपैकी फक्त सातच झाडेच जगली आहेत.

मध्यंतरी एकदा ही झाडे ताब्यात घेण्यासाठी महामेट्रोकडून वन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. पण, वन विभागाने प्रत्येक झाडाला आळे करा, सर्व झाडांचे लेखापरीक्षण करून झाडे आमच्या ताब्यात द्या, असे सांगितले. त्यानंतर महामेट्रोकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता तळजाई टेकडीवर फक्त झाडांचे बुंधे दिसत आहेत. ते वाळून, कुजून चालले आहेत. फक्त सात झाडांना पालवी फुटली आहे, ती झाडेही आता पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महामेट्रो आणि वन विभाग यांच्याकडे, लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जिवंत आहेत, याची कोणतीही नोंद नाही, इतका अनागोंदी कारभार तळजाई टेकडीवर सुरू आहे. पुनर्रोपण केलेले एक झाड जगले नाहीतर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचा नियम आहे. वाळून गेलेल्या झाडांची माहिती घेऊन ठेकेदारांकडून नव्या रोपांची लागवड करून घेणार आहोत. या पूर्वी मेट्रोने तळजाईवर चार हजार झाडे लावली आहेत. या झाडांची वाढ चांगली होत आहे, अशी प्रतिक्रिया महामेट्रोचे हॉर्टिकल्चरचे व्यवस्थापक बाळासाहेब जगझाप यांनी दिली.

ठेकेदारांकडून उपठेकेदारांची नेमणूक

‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने विचारणा केल्यानंतर मेट्रो प्रशासनाने त्यांचे व्यवस्थापक बाळासाहेब जगझाप, ठेकेदारांचे प्रतिनिधी, स्थानिक कर्मचारी आणि ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने तळजाईवर एकत्रित पाहणी केली. या वेळी ५६ झाडांपैकी फक्त सातच झाडे जिवंत असल्याचे दिसून आले. मेट्रो मार्गातील झाडे तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुनर्रोपणासाठी मेट्रोने ठेकेदार नेमले. त्या ठेकेदारांनी उप ठेकेदार नेमून झाडांचे पुनर्रोपण केले. या झाडांची काळजी घेण्यासाठी स्थानिक व्यक्तींची नेमणूक करण्यात आली. पण, प्रत्यक्ष झाडांची काळजी कोणी घेतलीच नाही. त्याचा परिणाम म्हणून झाडांच्या पुनर्रोपणासारख्या चांगल्या संकल्पनेचा पार बोजवारा उडाला आहे.