पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ जून रोजी घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेच्या तुलनेत जूनमधील परीक्षेची नोंदणी सुमारे सव्वा लाखांनी वाढली असून, ६ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

राज्य परीक्षा परिषदेने २५ मार्च रोजी टीईटीची अधिसूचना आणि वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू करण्यात आली. तसेच नोंदणीसाठी मुदतवाढ देऊन २४ एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. आता अर्ज अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशिवाय आता सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

परीक्षा परिषदेने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या टीईटी परीक्षेतील दोन्ही पेपर मिळून ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवारांनी परीक्षा दिली, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित राहिले. तर संबंधित परीक्षेत ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. टीईटीच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक ११ टक्के निकाल लागला होता.

या पार्श्वभूमीवर जूनमध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या नोंदणीबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, टीईटीसाठी ६ लाख २ हजार उमेदवारांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. येत्या दोन दिवसांत आकडेवारी अंतिम करण्यात येणार आहे. गेल्या टीईटीपेक्षा या वेळी नोंदणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, टीईटी परीक्षेचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ९ ते २१ जून या कालावधीत प्रवेश अर्जाची मुद्रित प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. २१ जून रोजी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत टीईटी पेपर क्रमांक १ होईल. त्यानंतर पेपर क्रमांक २ दुपारी अडीच ते पाच या वेळेत होणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.