Mahabaleshwar Doppler Radar Starts: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयआयटीएम) ‘मिशन मौसम’अंतर्गत महाबळेश्वर येथील ‘हाय अल्टिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी’ मध्ये अत्याधुनिक ‘एक्स बँड ड्युअल-पोलरायझेशन डॉप्लर वेदर रडार’ बसवण्यात आला आहे. ही रडार प्रणाली आकाशातील एका ‘हवामान डोळ्या’प्रमाणे काम करून पाऊस, ढग, वादळ प्रणालींचा तत्काळ (रिअल-टाइम) मागोवा घेण्यासाठी वातावरणाचे सतत स्कॅनिंग करणार असून, या प्रणालीमुळे पुण्यासह सातारा, कोकण मुंबईच्या काही भागांसाठी ‘नाऊकास्टिंग’ (तातडीचा अंदाज) क्षमता आता तीन तासांपर्यंत वाढू शकणार आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांच्या हस्ते या रडारचे उद्घाटन करण्यात आले. आयआयटीएमचे संचालक ए. सूर्यचंद्र राव, ‘सॅक-इस्रो’चे संचालक सौम्य एस. सरकार या वेळी उपस्थित होते. पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून सुमारे १४०० मीटर उंचीवर ही रडार प्रणाली बसवण्यात आली आहे. वेगाने हवामान बदलणाऱ्या, मोठ्या प्रमाणात पाऊस, धुके पडणाऱ्या, वेगवान वारे वाहणाऱ्या महाबळेश्वरसारख्या भागातील स्थानिक हवामान स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ही रडार प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावेल. दुर्गम आणि जटील भूप्रदेशावरील पर्वतीय पावसाची गतिशीलता आणि खोलवर चालणाऱ्या संवहनी प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

आकाशातील एका ‘हवामान डोळ्या’प्रमाणे ही रडार प्रणाली काम करून पाऊस, ढग आणि वादळ प्रणालींचा तत्काळ (रिअल-टाइम) मागोवा घेण्यासाठी वातावरणाचे सतत स्कॅनिंग करणार आहे. त्यामुळे सातारा, पुणे, कोकण, मुंबईच्या काही भागांसाठी ‘नाऊकास्टिंग’ची (तातडीचा अंदाज) क्षमता तीन तासांपर्यंत वाढवते. ९.४५ गिगाहर्ट्झवप ‘सॉलिड-स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर’ तंत्रज्ञानासह कार्यरत असलेली ही रडार प्रणाली उच्च विश्वासार्ह, कमी देखभाल लागणारी आणि ऊर्जा कार्यक्षम आहे. याची ‘ड्युअल-पोलरायझेशन’ क्षमता ढगांच्या सूक्ष्म भौतिकशास्त्राबद्दल सखोल माहिती उपलब्ध करू शकणार आहे. त्यात पावसाची वैशिष्ट्ये, पावसाच्या थेंबांच्या आकाराचे वितरण आणि वादळाची रचना यांचा समावेश होतो. उच्च अवकाशीय रिझोल्यूशन आणि जलद माहिती देण्याच्या क्षमतेमुळे पावसाच्या प्रमाणाचा अंदाज आणि वर्गीकरण सुधारण्यास मदत होऊ शकणार असल्याची माहिती आयआयटीएमने दिली.

महाबळेश्वर येथील रडार प्रणाली पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पूर्वसूचना व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने एक मोठी प्रगती आहे. तीव्र हवामान स्थितीसाठी वेळेवर इशारा देणे, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची सुरक्षा वाढवणे या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे रविचंद्रन यांनी सांगितले. रडार प्रणालीमुळे नाऊकास्टिंग क्षमतेत लक्षणीय वाढ होऊ शकणार आहे. तसेच हवामान अंदाज, हवामान प्रारुपांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे डॉ. सूर्यचंद्र राव यांनी नमूद केले.

रडार प्रणालीचे महत्त्व

​महाबळेश्वर येथे बसवण्यात आलेली रडार प्रणाली पावसाची प्रक्रिया, वादळाची रचना आणि अत्यंत तीव्र हवामान घटनांचे सखोल संशोधन करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. पूर आणि भूस्खलनासाठी पूर्वसूचना प्रणाली, विमान वाहतूक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, कृषी सल्लागार आणि जलसंपदा नियोजनासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या भागातील परिणाम आधारित हवामान अंदाज, हवामान लवचिकता अधिक मजबूत होऊ शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आयआयटीएम, सॅक यांच्यात करार

प्रगत उपग्रह-आधारित हवामान उत्पादने विकसित करण्यासाठी आयआयटीएम आणि इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. उपग्रह आणि जमिनीवरील निरीक्षणांचे एकत्रीकरण करणे, वातावरणीय आणि धुलिकण विदाचे प्रमाणीकरण सुधारणे, अंदाजाची अचूकता वाढवणे, खोल संवहन, वीज पडणे, हवामान बदलाचे परिणाम अशा क्षेत्रातील संशोधन, उपग्रह हवामानशास्त्रातील क्षमता विकास आणि प्रशिक्षणाचे काम या या कराराअंतर्गत केले जाणार आहे.