पुणे : महाबळेश्वरची ओळख असलेल्या लालचुटूक स्ट्रॉबेरीची लोकप्रियता लक्षात घेऊन टपाल विभागाने विशेष सचित्र टपाल शिक्क्याचे (कॅन्सलेशन) प्रकाशन केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाने महाबळेश्वरच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली असून, त्याला भारतीय कृषी क्षेत्रामध्ये एक विशेष स्थान प्राप्त आहे. या विशेष शिक्क्यामुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी टपालाच्या माध्यमातून घराघरात पोहोचणार आहे.
हेही वाचा >>> नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
महाबळेश्वर स्ट्रॉबेरीवर आधारित विशेष चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनचे प्रकाशन मुंबई टपाल विभागाच्या सचिव वंदिता कौल यांच्या हस्ते मुंबईतील टपाल विभागाच्या मुख्य कार्यालयात (जीपोओ) करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा टपाल विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, पुणे विभागाच्या सुचिता जोशी आणि महाराष्ट्र विभागाचे संचालक अभिजित बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी प्रत्यक्ष तर, पुणे टपाल विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जयभाये हे महाबळेश्वर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हेही वाचा >>> भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून
कौल म्हणाल्या, ‘महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीचा स्वाद आणि त्याचे व्यावसायिक महत्त्व देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. त्यावर आधारित विशेष शिक्का प्रसिद्ध झाल्याने स्ट्रॉबेरीला नवा गौरव मिळाला आहे. स्ट्रॉबेरी हे केवळ एक कृषी उत्पादन नाहीच, तर या शिक्क्यातून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा, महाबळेश्वरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक अधोरेखित होणार आहे. यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल.’ जायभाये यांनी टपाल विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘हा शिक्का विविध टपाल तिकिटे, कागदपत्रे आणि पोस्टल सामग्रीवर बघायला मिळणार आहे. महाबळेश्वर टपाल कार्यालयांमध्ये हा चित्रात्मक शिक्का उपलब्ध होणार असल्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला अधिक व्यापक ओळख मिळेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.