श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५०० मिष्टान्नाचा महाभोग!

तब्बल २५ हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळले मंदिर ; कळसावरही दिव्यांची आकर्षक आरास

गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट अशा सर्व चवींनी युक्त नानाविध प्रकारची फळे, नमकीन पदार्थ, खाद्यपदार्थ आणि मिठाई अशा ५०० पेक्षा अधिक मिष्टान्नांचा महाभोग अन्नकोटाच्या माध्यमातून दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यात आला. कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २५ हजार पणत्यांनी सजलेल्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक काळे, डॉ.मुरलीधर तांबे, डॉ.अजय तावरे, डॉ.हरीश ताटिया, डॉ. सोनाली साळवी, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी उपस्थित होते.

मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५०० हून अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात, वृद्धाश्रम, अंधशाळा आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahabhog of 500 sweets for rich dagdusheth ganpati msr 87 svk

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या