पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी परिसरात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे एका गोदामावर छापा टाकून एक लाख ३०० रुपयांचे तब्बल ८१ गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अवैध कारभार सुरू होता. कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा तांत्रिक मानके न पाळता, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग (पलटी) केली जात होती. गॅस गळती झाल्यास येथे मोठा स्फोट होऊन शेकडो निष्पापांचे जीव गेले असते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच टाकलेला हा छापा संभाव्य भीषण अनर्थ टाळणारा ठरला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, महेश खांडे, नितीन लोखंडे, गणेश कोकणे, अमर कदम आणि विशाल गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
भरधाव दुचाकीची बीआरटी बसस्टॉपला धडक; चालकाचा मृत्यू
पिंपळे सौदागर येथील पी. के. चौकाजवळ भरधाव दुचाकीने बीआरटी बसस्टॉपच्या भिंतीला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १ जूनच्या मध्यरात्री साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली.
संकेत प्रभाकरराव गुंजकर (रा. वनाज, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या मित्राने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा दुचाकी भरधाव व बेजबाबदारपणे चालवत असताना त्याने बसस्टॉपला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी हा गंभीर जखमी झाला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एक आरोपी अटकेत
खेड तालुक्यातील मरकळ येथे जुन्या वादातून सहा जणांच्या टोळीने एका तरुणावर कोयता व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. ही घटना १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर महादेव पाचपुते (वय २२, रा. मरकळ) यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रज्वल टाकळकर याला अटक केली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कंपनीच्या नादी लागू नका” असे म्हणत आरोपींनी हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रज्वल टाकळकर याला अटक करण्यात आली आहे. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
भांडण सोडवणाऱ्याला सिमेंटचा गट्टूने मारहाण
मित्रासोबत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाजा सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना पिंपरीतील युगांतर चौकात रविवारी (दि. ३१ मे) रोजी घडली.
एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मित्राला मारहाण होत असल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्याने आरोपीने सिमेंटचा गट्टू तोंडावर मारला. या हल्ल्यात फिर्यादी पुढील दात तुटला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
