पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) ते निगडी या प्रस्तावित उन्नत मार्गिकेवरील विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, ४.४१ किलोमीटर अंतरावरील चार स्थानकांमधील सुविधांचे काम कोलोसस इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लि. या कंपनीला देण्यात आले आहे. महामेट्रोने कोलोसस कंपनीशी ७८.५ कोटी रुपयांचा करार केला असून, पुढील पावणेदोन वर्षांत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महामेट्रोने पहिल्या टप्प्यातील मार्गिकांच्या विस्तारीकरणाचे काम दुसऱ्या टप्प्यात हाती घेतले आहे. त्यानुसार, स्वारगेट ते पीसीएमसी या मार्गिकेचा निगडीपर्यंत विस्तार करण्याबाबत महामेट्रोकडून सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला होता. राज्य सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये डीपीआरला मंजुरी दिली. त्यानंतर २०२३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आणि सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) सुमारे एक हजार ४८ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली. ४.४१ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती ही चार उन्नत स्थानके मंजूर करण्यात आली.

महामेट्रोने या स्थानकांची संरचना, इलेक्ट्रिक पुरवठा, सरकते जिने, उद्वाहन, ई अँड एम यंत्रणा आणि इतर तांत्रिक सुविधांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. २९ ऑगस्ट २०२५ रोजी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. यामध्ये एकाच कंपनीने बोली सादर केली होती. २ सप्टेंबर रोजी आर्थिक निविदा उघडल्या आल्या आणि १२ फेब्रुवारी रोजी आर्थिक मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर कोलोसस इन्फ्रा प्रोजेक्ट्सची बोली सर्वांत कमी असल्याने या कंपनीशी करार जाहीर करण्यात आला आहे, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

या प्रवाशांना फायदा

सध्या पीसीएमसी ते स्वारगेटपर्यंत १७.४ किलोमीटर लांबीची ‘पर्पल लाइन’ कार्यरत आहे. यामध्ये १४ स्थानकांचा समावेश असून, निगडीपर्यंतच्या विस्तारामुळे पिंपरी-चिंचवड आणि निगडी भागातील प्रवाशांना मेट्रोची थेट मध्यवर्ती भागापर्यंत सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रदूषणमुक्तीकडेही वाटचाल होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

महामेट्रोकडून दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांचा विस्तार वेगाने करण्यात येत असून, पीसीएमसी ते निगडी हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे. नागरिकांना लवकरच या सुविधेचा लाभ मिळेल. कोलोसस इन्फ्रा प्रोजेक्ट्सने पूर्वीही मेट्रो प्रकल्पांमध्ये काम केले असून, लवकरच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. – चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो, पुणे</strong>