पुणे : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात सलग दुसऱ्या दिवशी बदल करावा लागला असून, संकेतस्थळाला येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यास २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पहिली निवडयादी २९ मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यभरातील अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अकरावीची नियमित पहिली फेरी गुरुवारी सुरू करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदवणे आवश्यक होते. मात्र, गुरुवारी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर ताण आल्यामुळे ते काही वेळ बंद पडले. त्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यास २३ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शुक्रवारीही संकेतस्थळाला अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, आतापर्यंत ११ लाख ३६ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीच्या विद्यार्थी नोंदणीसाठी २१ ते २३ मे या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये बदल करून २५ मेपर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप (पहिल्या फेरीची ॲलॉटमेंट) २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे ते ३ जून या कालावधीत संबंधित महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे. ५ जून रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेत अडचणी
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळाला येणाऱ्या तांत्रिक अडचणींशिवाय अन्य अनेक अडचणी येत आहेत. संकेतस्थळ बंद पडल्याने वेळापत्रकांमध्ये बदल करावे लागले. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेबाबतचे माहितीपुस्तक तयार करून ऑनलाइन उपलब्ध करून दिले. पण विद्यार्थी, शिक्षकांचे उद्बोधन वर्ग आयोजित केले नाहीत. काही शिक्षकांना प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे या बाबत पुरेशी माहिती नाही. तसेच, सध्या जनगणना, मतदारयाद्या सुधारणा अशा कामांमध्ये शिक्षक अडकलेले आहेत. त्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचेही काम असल्याने महाविद्यालयाच्या स्तरावर गोंधळाची स्थिती आहे, असे एका महाविद्यालयातील शिक्षकाने नमूद केले.
महाविद्यालय, प्रवेशासाठीच्या जागा शोधण्यासाठी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दोन दुव्यांवर अनेकांनी बराच वेळ घालवल्यामुळे संकेतस्थळावर ताण येत होता. ही बाब लक्षात आल्यावर आता संबंधित दुवे हटवून तो तपशील पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक
