पुणे : राज्यात अकरावीप्रमाणेच बारावीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही प्रवेशासाठीचे संकेतस्थळ अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने बारावीला महाविद्यालय, शिक्षण मंडळ (बोर्ड) बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबत महाविद्यालयाच्या स्तरावर पेच निर्माण झाला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते. त्या धर्तीवर बारावीचे प्रवेशही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये ऑनलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला शाखा बदल, पालकांची बदली, वैद्यकीय कारण अशा अपवादात्मक परिस्थितीत इयत्ता बारावीला त्याच जिल्ह्यातील अथवा जिल्ह्याबाहेरील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच त्यानुसार पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने प्रवेश करण्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले होते.

एका महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्याच्या सूचना देण्यात आल्याने संबंधित विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. मात्र, आता शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही प्रवेशाबाबत स्पष्टता नाही, संकेतस्थळ सुरू झाले आहे किंवा नाही याबाबतही माहिती मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. त्यामुळे बारावीच्या प्रवेशाबाबत तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीने प्रवेश करण्याच्या अनिवार्यतेचा प्रवेशावर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.

‘बारावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन करायचे शासनाच्या स्तरावर निश्चित झाल्यानंतर त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्याची प्रक्रिया झटपट का करण्यात आली नाही, प्रत्येक बाबतीत शिक्षण विभागाकडून दिरंगाई कशी होते,’ असे प्रश्न एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपस्थित केले.

बारावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच संकेतस्थळ कार्यान्वित करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक