पुणे : सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) उत्तीर्ण झालेल्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनने आता बेमुदत संप पुकारला आहे.

या संदर्भात मंगळवारी रात्री महाराष्ट्र राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये बेमुदत संपाबाबत निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात ५२ हजार डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनशी निगडित आहेत, तर संघटनेच्या ३६ जिल्ह्यांमध्ये २३० शाखा कार्यरत आहेत. या संपाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ही आज, बुधवारपासून संपात सहभागी होत आहे. महाराष्ट्रातील एकूण ३२ शासकीय महाविद्यालयांतील ‘मार्ड’चे डॉक्टर यात सहभागी होतील.
पुणे जिल्ह्यात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या १२ शाखा असून, शहरांमध्ये ॲलोपथीचे आठ हजार डॉक्टर आहेत. एकूण ११ हजार डॉक्टर बेमुदत संपावर गेले असून, बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील ‘मार्ड’चे जवळपास पाचशे डॉक्टरही सहभागी होणार आहेत.

विविध संघटनांचा संपाला पाठिंबा

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुणे विभागाने एक दिवसीय संपाचा निर्णय रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केला. याबाबतचा निरोप डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयाविरोधात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये या संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान, नोंदणीबरोबरच निष्काळजीपणाच्या तक्रारी हाताळणे आणि नैतिकतेवर अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश मिळाले असून, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी यांनी सांगितले.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी होऊ नये, या मागणीसाठी आम्ही बेमुदत संप पुकारत आहोत. यासाठी महाराष्ट्र ‘मार्ड’ डॉक्टरांनीही आम्हाला पाठिंबा दर्शवला असून, आजपासून हे डॉक्टर आमच्याबरोबर संपामध्ये सहभागी होत आहेत. – डॉ. विक्रांत देसाई, सचिव, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन

‘सीसीएमपी’ पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’कडून सशर्त नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास मंगळवारी सायंकाळपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून ‘सीसीएमपी’ पात्र डॉक्टरांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या एकजुटीमुळे हा ऐतिहासिक दिवस पाहायला मिळत आहे. उर्वरित पात्र ‘सीसीएमपी’ डॉक्टरांनाही लवकरात लवकर नोंदणी प्रमाणपत्रे मिळावीत, अशी आमची अपेक्षा आहे.
– डॉ. बाळकृष्ण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र