पुणे : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर २०१३ मध्ये राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. या कायद्यांतर्गत आतापर्यंत दोन हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्षाला सरासरी दोनशेहून अधिक गुन्हे या कायद्यांतर्गत करण्यात येतात,’ अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी शनिवारी दिली. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर जनजागृतीसाठी शिवप्रेमी डोंगरे प्रतिष्ठानातर्फे आयोजित प्रबोधन सभेत देशमुख बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, सामाजिक कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे, डॉ. गीताली वि. मं., ॲड. प्रार्थना सदावर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या ॲड. रूपाली ठोंबरे यांनी या सभेत मार्गदर्शन केले. डोंगरे प्रतिष्ठानाचे प्रमुख मारुती डोंगरे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘समाजात चिकित्सक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. नरेंद्र दाभोलकरांनी सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन ही दशकांची नाही, तर शतकांची लढाई आहे, हे खरात प्रकरणानंतर अधोरेखित झाले. दाभोलकरांच्या खुनानंतर राज्यात जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती झाली. मात्र, त्या विषयीचे नियम केले गेले नाहीत. या कायद्यांतर्गत अनेक भोंदूबाबांवर कारवाई झाली.’
‘राज्यात भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. जादूटोणाविरोधी कायदा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हायला हवी. त्यासाठी कडक नियम हवे. त्याचबरोबर खरातसारख्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयात खटले चालवले गेले पाहिजेत,’ अशी भूमिका सरोदे यांनी मांडली.
‘घरातीलच लोक महिलांना समजून घेत नसतील, तर महिला भोंदूबाबांच्या सहज आहारी जातात, त्यांच्या बळी ठरतात. प्रबोधनाचा प्रारंभ घरापासूनच होणे आवश्यक असून, त्यातून समाजाचे प्रबोधन करणे शक्य होईल,’ असे ठोंबरे म्हणाल्या. स्त्री-पुरुष संबंध, त्यांच्या लैंगिक-नैसर्गिक भावनांबाबत अधिक मोकळेपणाने बोलण्याची गरज डॉ. गीताली वि. मं. यांनी अधोरेखित केली. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
राज्याचे भविष्य काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा, समाजप्रबोधनाचा मोठा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अशोक खरातसारखे भोंदू निर्माण होत असतील, तर तो महाराष्ट्रावरचा, इथल्या संस्कृतीवरचा अत्याचार आहे. खरातच्या दर्शनाला जाणारे सगळ्याच पक्षातील आमदार, मोठे नेते, अत्याचार झालेल्या स्त्रियांना गर्भधारणा होऊ नये म्हणून किंवा त्यांचा गर्भ पाडण्यासाठी मदत करणारे डॉक्टर, खरातला साथ देणारे सगळेच राज्याच्या संस्कृतीभोवती व्यापलेले जाळे आहे. हाच विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित आहे का, या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्राचे भविष्य काय,’ अशा प्रश्नांची सरबत्ती श्रीपाल सबनीस यांनी केली.
